गुजरातच्या `कोरोना` हॉटेलचा इतिहास
उर्दू भाषेतील ‘कोरोना’ शब्दचा अर्थ...
गुजरात : भारतात कोरोना रूग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत सतत वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्रानंतर गुजरातमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे कोरोनाचं नाव ऐकलं तरी लोकांच्या मनात कोरोनाविषयी भीती निर्माण होते. अशात गुजरातच्या बनासकांठामधील कोरोना नावाचं हॉटेल आता लोकांमध्ये आकर्षणाचा विषय ठरत आहे. २०१५ साली याठिकाणी कोरोना हॉटेलची स्थापना झाली. सध्या कोरोना संपूर्ण जगासाठी धोकादायक असला तरी उर्दू भाषेतील ‘कोरोना’शब्दचा अर्थ वेगळाच आहे.
गुजरातच्या सिद्धपूर येथे राहणाऱ्या बरकतभाई यांनी २०१५ मध्ये या हॉटेलची सुरूवात केली. व्यवसाय सुरू करताना हॉटेलचं नाव काय ठेवणार असा विचार त्यांच्या डोक्यात आला. तेव्हा उर्दु भाषेतील कोरोना हा शब्द त्यांना सुचला. उर्दुमध्ये कोरोना शब्दाचा अर्थ स्टार गॅलेक्सी असा आहे.
या नावाचा उलगडा त्यांनी 'आज तक'सोबत बोलताना केला. 'उर्दुमध्ये कोरोनाचा अर्थ स्टार गॅलेक्सी असा आहे. जेव्हापासून कोरोना व्हायरसचा फैलाव झाला आहे, तेव्हा पासून लोक हॉटेलसमोर उभे राहतात आणि सेल्फी काढतात.' गुजरातच्या महामार्गालगत हा हॉटेल आहे. त्यामुळे कोरोना हॉटेल सध्या चर्चेचा विषय बनत आहे.
दरम्यान, देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. येत्या १७ तारखेला तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाउन संपणार आहे. तरी देखील कोरोनाची साखळी मात्र तुटलेली नाही. त्यामुळे काही राज्यातील मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची मागणी मोदींकडे केली.