लेक सतत फोनवर बोलायची, प्रतिष्ठेपायी वडिलांनी, काकांनी तिला संपवल; नंतर पोलिसांत जाऊन...
Crime News In Marathi: प्रतिष्ठेपायी स्वतःच्याच मुलीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Crime News In Marathi: उत्तर प्रदेशच्या पीलीभीतमध्ये ऑनर किलिंगचा (Honor killing) प्रकार समोर आला आहे. प्रेमप्रकरणाच्या संशयातून वडिलांनी व काकांनी मुलीचा गळा आवळून खून केला आहे. त्यानंतर मुलीचा मृतदेहावर डिझेल टाकून त्याची विल्हेवाट लावली. त्यानंतर नदी किनारीच खड्डा खणून त्यात गाडून टाकण्यात आले. मुलीची हत्या केल्यानंतर आरोपींनी स्वतःहूनच पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा तपास केला तेव्हा संपूर्ण प्रकरण समोर आले. (Crime News Today)
लेकीची हत्या करुन पोलिसांत गेले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजीव कुमार यांनी 8 मार्च रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तक्रारीत त्यांनी म्हटलं होतं की, त्यांची मुलगी इंटर कॉलेजची विद्यार्थीनी असून ती अचानक बेपत्ता झाली आहे. त्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करुन विद्यार्थिनीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तपास करण्यास सुरुवात केल्यानंतर पोलिसांना समजलं की, विद्यार्थिनी शाळेत पोहोचलीच नाही. तर, चौकशीच्या वेळेत विद्यार्थिनीचे वडिल आणि काक सतत त्यांचा जबाब बदलत होते.
विद्यार्थिनीचे वडिल आणि काका यांचे जबाब संशयास्पद वाटत असल्याने त्यांनी चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच विद्यार्थिनीचे वडील राजीव कुमार आणि काका संजय कुमार यांनी संपूर्ण घटनेची कबुली दिली आहे.
पोलिसी खाक्या दाखवताच सत्य कथन केले
पोलीस अधीक्षक अविनाश पांडे यांनी सांगितले की, मयत मुलीचे वडील आणि काका यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी सत्य सांगितले आहे. त्यांनी म्हटलं की, मुलगी सतत कोणाशीतरी फोनवर बोलत असायची. प्रेमप्रकरणाचा संशय आल्यानंतर वडिलांनी त्याच्या भावाच्या मदतीने घरातील एका खोलीतच तिची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेह ओळखू येऊ नये म्हणून त्यावर पेट्रोल टाकून जाळला.
मृतदेह जाळल्यानंतर रात्री नदीच्या किनारी खड्डा खणून त्यात मृतदेह पुरला. त्यानंतर कोणालाही संशय येऊ नये म्हणून पोलिसांत जाऊन ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांना सत्य कळताच त्यांनी नदी किनारी जाऊन विद्यार्थिनीचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तर, दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील प्रकरणाचा तपास सुरू आहे.