मध्यप्रदेश : मध्य प्रदेशातल्या सागर जिल्ह्यातल्या एका वृद्धाच्या डोक्यावर चक्क शिंग उगवलं होतं. चार इंच लांब वाढलेले हे शिंग शस्त्रक्रिया करून काढून टाकण्यात आलं आहे. माणसाला शिंग फुटल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येतं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एखादा माणूस अतिशहाणपणा करायला लागल्यावर त्याला आपण तुला शिंगं फुटली का? असं म्हणतो. पण हा वाक्यप्रयोग आपण सर्रास वापरला तरी माणसाला शिंगं काही फुटलेली आपण पाहिली नाही. पण हे खरोखर घडलंय. 


मध्य प्रदेशातल्या सागर जिल्ह्यातील श्यामलाल यादव नावाच्या आजोबांच्या डोक्यावर खरोखरचं शिंग उगवलं होतं. काही वर्षांपूर्वी त्यांच्या डोक्याला जबर जखम झाली होती. या जखमेनंतर त्यांच्या डोक्यावर चार बाय चार इंच आकाराचं शिंग उगवलं होतं. श्यामलाल यांनी सागरमधील एका खासगी रुग्णालयात दाखवल्यानंतर त्यांच्या डोक्यावरचं हे शिंग शस्त्रक्रिया करुन काढून टाकण्यात आलं.


डोक्यावरील पेशींच्या विशिष्ट वाढीमुळे अशी डोक्यावर शिंगं उगवल्याच्या घटना घडल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. श्यामलाल यांच्या डोक्यावरील शिंग काढल्यानंतर त्या ठिकाणी खड्डा पडला होता हा खड्डा बुजवण्यासाठी प्लास्टिक सर्जरी करण्यात आली.


हे पहिल्यांदाच घडलेलं नाही. आपल्या शेजारी असलेल्या बांगलादेशातल्या जमालपुरातील एका दुसऱ्या आजोबांच्याही डोक्यावरही असंच शिंग उगवलं होतं. तिथल्या डॉक्टरांनीही हे शिंग काढून टाकलं.