१३५ रूपयांचा चहा, १८० रूपयांची कॉफी, पी चिदंबमरमना फुटला घाम
चेन्नई विमानतळावर त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला आहे. तसेच, अशा स्थितीत काय करावे याचे उत्तरही त्यांनी यूजर्सकडून मागवले आहे.
नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी वाढत्या महागाईचा चांगलाच धसका घेतला आहे. इतका की, चहा आणि कॉफीचे बिल पाहून त्यांनी चक्क चहाच घ्यायला नकार दिला. १३५ रूपयांचा चहा आणि १८० रूपयांची कॉफी पाहून चिदंबरम यांना धक्काच बसला. चेन्नई विमानतळावर त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला आहे. तसेच, अशा स्थितीत काय करावे याचे उत्तरही त्यांनी यूजर्सकडून मागवले आहे.
आपल्या ट्विटमध्ये चिदंबरम यांनी म्हटले आहे की, चेन्नई विमानतळावर कॉफी डेमध्ये मी चहा ऑर्डर केला. गरम पाणी आणि टी बॅग यांची किंमत १३५ रूपये. तर, कॉफी १८० रूपये. अत्यंत भीतीदायक. मी नकार दिला. मी बरोबर आहे की चुकीचा? दरम्यान, याच ट्विटरनंतर चिदंबरम यांनी आणखी एक ट्विट केले आहे.
पुढच्या ट्विटमध्ये चिदंबरम म्हणतात, मी विचारले १८० रूपयांची कॉफी? मी विचारले घेतं तरी कोण? उत्तर आले खूप लोक घेतात. खरंच मी आऊटडेटेड झालोय?
दरम्यान, चिदंबरम यांच्यासाठीचा काळ सध्या अनुकुल आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणी त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना कोर्टातून बेल मिळाली आहे. पण, देश सोडून जाण्यावर त्यांना मनाई करण्यात आली आहे.