Agniveer Amritpal Sing Death : काश्मिरच्या राजौरी सेक्टरमध्ये कर्तव्यावर असलेल्या अग्निवीर अमृतपाल सिंग (Agniveer Amritpal Sing) यांचा मृत्यू झाला आहे. अग्निवीर अमृतपाल सिंग यांचा स्वत: च्या बंदुकीतील गोळी लागून मृत्यू झाला आहे. अमृतपालच्या मृत्यूच्या कारणाचा अधिक तपशील शोधण्यासाठी लष्कराचे (Indian Army) अधिकारी न्यायालयीन चौकशी करत आहेत. अमृतपालाल त्याच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मात्र अग्निवीर अमृतपाल सिंग यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी लष्कराने 'गार्ड ऑफ ऑनर' (guard of honour) न दिल्याबद्दल पंजाबमधील (Punjab) विरोधी पक्षांनी शनिवारी शोक व्यक्त केला आहे. याबाबत आता भारतीय लष्कराने स्पष्टीकरण दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

10 ऑक्टोबर रोजी जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये अग्निवीर अमृतपाल सिंह यांचा गोळी लागल्याने मृत्यू झाला. अमृतपाल सिंगला नियंत्रण रेषेजवळ तैनात करण्यात आले होते. अमृतपालला लष्कराकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला नाही असा आरोप आता विरोधी पक्षांकडून केला जात आहे. यावरुनच आता विरोधी पक्ष मोदी सरकार आणि अग्निवीर योजनेवर जोरदार निशाणा साधत आहेत. मात्र भारतीय लष्कराने या सगळ्याबाबत स्पष्टीकरम दिलं आहे.


शिरोमणी अकाली दल (एसएडी) नेते बिक्रम मजिठिया यांनी शहीद अमृतपाल सिंग यांना सन्मानित न करण्याच्या निर्णयाचा निषेध केला. अमृतपाल यांना 'गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला नाही. शहीदाचे पार्थिव पंजाबला घरी आणण्यासाठी लष्कराची रुग्णवाहिकाही उपलब्ध करून देण्यात आली नाही, असे बिक्रम मजिठिया यांनी म्हटलं आहे. यानंतर आता अकाली दलाने अग्निवीर योजना रद्द करण्याची आणि त्याअंतर्गत आतापर्यंत भरती झालेल्या सर्व सैनिकांच्या सेवा नियमित करण्याची मागणी केली आहे. 


नेमकं काय घडलं?


अग्निवीर योजनेद्वारे सैन्यात भरती झालेले अमृतपाल सिंग हे पंजाबमधील मानसा येथील रहिवासी होते. मनकोट सेक्टरमधील फॉरवर्ड पोस्टवर कॉन्स्टेबल म्हणून तैनात होते. 10 ऑक्टोबर रोजी सकाळी जम्मू-काश्मीरमध्ये त्यांचे निधन झाले. अमृतपालच्या सर्व्हिस रायफलमधून गोळी झाडण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र, या जवानाचा मृत्यू अपघाताने झाला की त्याने आत्महत्या केली हे स्पष्ट होऊ शकले नाही. अमृतपालचे वडील गुरदीप सिंग यांनी सांगितले की, त्यांचे मुलाशी 10 ऑक्टोबरलाच बोलणे झाले होते. त्यानंतर लष्कराचा एक सार्जंट आणि दोन सैनिक आपल्या मुलाचा मृतदेह घेऊन गावात आले. अमृतपालच्या डाव्या कानावर गोळी लागली होती.


भारतीय सैन्यानं दिलं स्पष्टीकरण


अग्निवीर अमृतपाल सिंग यांच्यावर लष्करी अंत्यसंस्कार न करण्याबाबत लष्कराकडून स्पष्टीकरण देण्यात आले असून लष्कराच्या अधिकाऱ्यांनी या खोट्या बातम्यांचे खंडन केले आहे. लष्कराच्या म्हणण्यानुसार, अमृतपालच्या मृत्यूचे कारण स्वत: ची दुखापत होती. त्यामुळे धोरणानुसार गार्ड ऑफ ऑनर किंवा लष्करी अंत्यसंस्कार प्रदान केले गेले नाहीत.  लष्कराच्या म्हणण्यानुसार, 'मृत्यूचे कारण स्वत: ची दुखापत होती. त्यामुळे त्याच्या पार्थिवासोबत असलेले कर्मचारी नागरी पोशाखात होते आणि मृतांना गार्ड ऑफ ऑनर किंवा लष्करी अंत्यसंस्कार देण्यात आले नाहीत. मृत व्यक्तीला नियम आणि उदाहरणांनुसार पूर्ण सन्मान देण्यात आला आहे.'