नवी दिल्ली : लोकसभेत आज एक 'ऐतिहासिक' क्षण सगळ्यांनाच पाहायला मिळाला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जागेवर जाऊन त्यांना अक्षरश: जबरदस्तीनं 'जादू की झप्पी' दिली. यादरम्यान पहिल्यांदा तर मोदींना राहुल गांधी नेमकं काय करतायत? याचा अंदाजच आला नाही... मात्र, राहुल गांधी यांनी मिठी मारून ते परत मागे फिरल्यानंतर मोदींनी त्यांना पुन्हा बोलावून राहुल गांधींशी हात मिळवला... आणि स्मितहास्यही केलं. हा क्षण सोशल मीडियात चर्चिला गेला नाही तरच नवल... सोशल मीडियावर तर या 'जादू की झप्पी'चा कीस पाडला गेलाय. 








अविश्वास ठरावादरम्यान सदनाची कारवाई एकदा स्थगित करून पुन्हा एकदा सुरू झाल्यानंतर 'श्रीराम'ची नारेबाजी करण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकदा राहुल गांधी भाषणासाठी उभे राहिले. यावेळी, राहुल गांधींनी उपहासात्मक पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसवर निशाणा साधला. 'कुणी म्हणेल पंतप्रधान मोदींबद्दल माझ्या मनात राग आहे... पण माझ्या मनात पंतप्रधान आणि संघाप्रती प्रेमच आहे. मी पंतप्रधान, भाजप आणि आरएसएसचा आभारी आहे... कारण त्यांनी मला 'काँग्रेस'चा आणि 'हिंदुस्थानी' असल्याचा अर्थ समजावला, असं राहुल गांधींनी संसदेत म्हटलंय. इतकंच नाही तर 'भाजपसाठी मी पप्पू असलो, माझ्याबद्दल राग असला तरी माझ्या मनात मात्र कुणासाठीही राग नाही', असं म्हणत सदनातच राहुल गांधींनी नरेंद्र मोदींच्या जागेवर जाऊन त्यांची गळाभेट घेतली.