भेसळयुक्त मिठाईपासून सावधान; येथे करा तक्रार
मिठाई बनवताना त्यात रिफाइन्ड ऑइल किंवा नकली तुपाचा वापर
नवी दिल्ली : दिवाळीला अवघा एक आठवडा बाकी आहे. अनेक जण दिवाळीच्या तयारीला लागले आहेत. पण या सगळ्या उत्साहात भेसळयुक्त माव्याचे पदार्थ बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. अनेक दुकानदार अधिक नफा कमावण्यासाठी भेसळयुक्त मिठाई बनवून विकत असल्याचे समोर आले आहे. याबाबतच्या माहितीनंतर, झी मीडियाची टीम अन्न सुरक्षा विभागाच्या (food safety department) अधिकाऱ्यांसोबत पटनाच्या बाजारात पोहचली असता, अनेक दुकानांवर छापा टाकल्यानंतर तेथून मिठाईसाठीचे भेसळयुक्त साहित्य जप्त करण्यात आले.
छापेमारीमध्ये अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी, दुकानातील मिठाई आणि दूधाची तपासणी केली. शिवाय काही नमुनेही जप्त केले. फूड सेफ्टी इन्स्पेक्टर अजय कुमार यांनी सांगितलं की, दुकानदार नफा कमावण्यासाठी मिठाई बनवताना त्यात मैदा मिसळतात. तसंच सब स्टॅंडर्ट दूध म्हणजेच क्रिम काढलेल्या दुधाची मिठाई बनवत असल्याचं त्यांनी सांगितलं.
अजय कुमार यांनी सांगितलं की, दुकानदार बाहेरुन नकली खवा मागवतात. त्यापासून मिठाई बनवताना त्यात रिफाइन्ड ऑइल किंवा नकली तुपाचा वापर करतात. नकली खवा किंवा भेसळयुक्त मिठाई खाल्ल्याने त्याचा थेट परिणाम पचनक्रियेवर होण्याची शक्यता असते. या भेसळीमुळे लिव्हरही खराब होण्याचा धोका असतो.
फूड सेफ्टी इन्स्पेक्टरने सांगितलं की, FSSAIच्या नियमांनुसार, तीन वेळापेक्षा अधिक रिफाइंड ऑइलचा वापर आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे अॅसिडिटी, गॅससारख्या समस्या होऊ शकतात.
मूळ रुपातील खव्यामध्ये भेसळ केली जाते. खवा बाहेरुन मागवला जातो आणि त्याला शुद्ध खव्यामध्ये मिसळलं जातं. पारंपारिक मिठाई बेसनपासून तयार केली जाते. पण त्यातही मैद्याची भेसळ केली जाते.
खव्यामध्ये क्रीम मिल्क पावडर टाकली जाते. खव्यातील स्निग्धता दाखवण्यासाठी अनेकदा त्यात रिफाइंड ऑइल किंवा नकली तूपही मिसळले जाते.
मिठाईच्या कोणत्याही दुकानातील मिठाईमध्ये भेसळ असल्याची शंका आल्यास ग्राहक याची तक्रार FSSAIकडे करु शकतात. FSSAIच्या अधिकृत वेबसाइटवर याची तक्रार करता येऊ शकते. शिवाय जिल्हा फूड इन्स्पेक्टरकडेही तक्रार दाखल करता येऊ शकते.