`हे सगळे छपरी...`, HR ने शेअर केले नोकरी नाकारलेल्या उमेदवारांचे मेसेज, Screenshots तुफान व्हायरल
नोएडामधील एका एचआरने नोकरीसाठी निवड न झालेल्या कर्मचाऱ्यांनी पाठवलेल्या अयोग्यस अश्लील मेसेजचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.
नोएडातील एका एचआरने नोकरीसाठी निवड न झालेल्या उमेदवारांकडून पाठवण्यात आलेल्या अयोग्य, अश्लील मेसेजचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. हर्षिता मिश्राने LinkedIn वर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने नाकारलेल्या उमेदवारांनी आपल्या व्यावसायिक सीमा ओलांडत अयोग्य वेळी संदेश पाठवण्याची पद्धत गेल्या काही काळापासून वाढली असल्याचं सांगितलं आहे. हा आता नियमित प्रकार झाला असल्याचंही तिने सांगितलं आहे.
"एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या. नाकारलं जाणं ही विकास करण्याची एक संधी असते, आपली सीमा ओलांडण्याचं निमंत्रण नाही. माझा फोन क्रमांक फक्त व्यावसायिक संवादासाठी आहे. एक प्रोफेशनल म्हणून तुम्ही येथे तुमचं करिअर निर्माण करण्यासाठी आला आहात. जर नसेल तर किमान दुसऱ्यांच्या सीमांची आणि वेळेची कदर करणाऱ्या व्यक्तीप्रती आदर दाखवा," असं तिने पोस्टमध्ये लिहिलं आहे.
नोकरीसाठा इच्छुक असणाऱ्या एका उमेदवाराने तिला 'जगातील सर्वात सुंदर तरुणी' म्हटलं. यावेळी त्याने कृपया रागावू नका अशी विनंतीही केली. या व्यक्तीने एकामागोमाग एक अनेक संदेश पाठवले असून तू माझी मुलाखत घेतली होतीस अशी आठवण करुन दिली. तसंच तू इतकी सुंदर आहेस की भेटल्यापासून मी तुला विसरु शकत नाही आहे असंही तो म्हणाला.
हर्षिता मिश्रा कोणत्याही प्रकारे त्याला प्रतिसाद देत नसतानाही तो मात्र तिला वारंवार मेसेज करत होता. त्याने तिला सलग 5 वेळा फोनही केला आणि काही सेकंदासाठी तुझा आवाज ऐकव असं सांगायचा.
दुसऱ्या स्क्रीनशॉटमध्ये एक उमेदवार नोकरीसाठी नाकारल्यानंतर हर्षिताला प्रेम कविता पाठवत असल्याचं दिसत आहे. त्याने आपल्याला का नाकारलं असा अभिप्राय विचारला असता हर्षिताने सांगितलं की, "सुधारणेची गरज आहे. आमच्यासाठी योग्य नाही'. लगेचच नाकारलेल्या उमेदवाराने तिला प्रेमकविता पाठवायला सुरुवात केली की तो तिच्याशिवाय राहू शकत नाही.
पण हे इथपर्यंत थांबलं नाही. दुसऱ्या एका उमेदवाराने आपला सुधारित सीव्ही पाठवण्याची संधी देण्यासाठी विनंती केली. या भूमिकेसाठी आवश्यक असलेल्या वर्षांचा अनुभवही त्याने मागितला. पण काही मिनिटांतच त्याने संभाषणाचा मार्ग बदलला आणि तिच्या शारीरिक स्वरूपावर अश्लील शेरेबाजी करु लागला.
'तू त्या दिवशी फारच हॉट दिसत होतीस,' असा मेसेज त्याने केला. तुला पाहिल्यापासून मी झोपू किंवा उठू शकत नाहीये असं त्याने त्यात लिहिलं होतं. हर्षिताने या सर्वांना उघडं पाडण्यासाठी मोबाईल नंबर न लपवताच मेसेज शेअर केले आहेत.
"अयोग्य वागणूक दिली जात असतानाही आदरपूर्ण आणि शांत वर्तन राखण्यासाठी मी वचनबद्ध आहे. पण याला माझा कमकुवतपणा समजू नका," असं तिने लिहिलं. जे लोक व्यावसायिकतेची मूलभूत पातळी देखील राखू शकत नाहीत ते आधीच अयशस्वी झाले आहेत. एक व्यावसायिक आणि एक माणूस अशा दोन्ही प्रकारे ते अयशस्वी आहेत," अशा शब्दांत तिने फटकारलं आहे.
हर्षिताची पोस्ट पाहून अनेक नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. अनेक युजर्सनी हर्षिताला काय करावं आणि काय नाही याबाबत सल्ला दिला आहे. "मी म्हणत नाही की यात तुमची चूक आहे. परंतु तुम्ही व्हॉट्सॲपऐवजी अधिकृत ईमेलद्वारे कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा," असा सल्ला एका युजरने दिला आहे. तर काहींनी अशा छपरींकडे लक्ष देऊ नको असं सांगितलं आहे.