हैदराबादच्या निझामाचा सोन्याचा डबा चोरीला, शोध घेण्यासाठी पोलिसांच्या १० टीम
हा डबा किती विशेष आहे ते तुम्हाला बातमी वाचल्यावरच समजेल...
हैदराबाद : हैदराबादच्या निझामचा खाण्याचा डबा चमच्यांसह चोरीला गेला आहे. अतिशय मौल्यवान समजला जाणारा हा सोन्याचा डबा आहे. हा डबा नुसताच सोन्याचा नाहीय, तर माणिक, निलम आणि हिरेजडीत आहे. हैदराबादमधील निझाम संग्रहालातून हा डबा चोरीला गेला आहे, रविवारी रात्री ही चोरी झाली. हा डबा शोधण्यासाठी पोलिसांनी १० टीम बनवल्या आहेत.
संग्रहालयाचे अधिकारी जेव्हा सोमवारी कामावर परतले तेव्हा त्यांना लक्षात आलं की, सोन्याचा डबा दिसत नाहीय. यानंतर त्यांनी पोलिसांकडे निझामाचा सोन्याचा डबा चमच्यासह चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली आहे.
संग्रहालयाला असलेल्या चिमणीतून आत प्रवेश करून चोरट्यांनी हा डबा लांबवला असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही चिमणी ४ फूट रूंद आहे. चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं तोंड फिरवल्याने त्यात फारसं काही चित्रित झालेलं नाही. पण पोलिसांना असा देखील संशय आहे की, संग्रहालयाच्या आत काम करणाऱ्यांपैकी एखाद्याचा यात सहभाग असू शकतो.
निझामाचा सोन्याचा डबा अमूल्य का? वाचा....
या संग्रहालायला अपुरी सुरक्षा आहे, तसेच सोन्याचा डबा चोरणाऱ्यांना जेरबंद करण्यासाठी पोलिसांच्या १० टीम तपासाच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. पुरावे नष्ट होऊ नयेत म्हणून सध्या संग्रहालय बंद ठेवण्यात आलं आहे.
या डब्याचं वजन २ किलो आहे, तो माणिक, निलम आणि हिरेजडीत आहे. हा प्राचीन आणि मौल्यवान समजला जाणारा डबा सातवा निझाम - मीर ओसमान अली खान यांचा होता. भारतात विलिन होण्यापूर्वी, हैदराबाद राज्यावर १९११ ते १९४८ पर्यंत मीर ओसमान राज्य करीत होते.
हा बहुमोल निझामाचा सोन्याचा डबा हैदराबादमधील पुरानी हवेलीत होता. हे निझामांचं शहरातील जुन्या जागांपैकी एक आहे.
इतिहासकार, आणि निझामच्या खजिन्याचे अभ्यासक सैफुला यांच्या मते या सोन्याच्या डब्याची बाजारात किंमत ६० लाख रूपये असेल. तसेच त्यावरील विविध कलाकृतींचा विचार केला, तर तो डबा १ कोटी रूपयांचा आहे.