पक्षाने सांगितल्यास पुस्तक मागे घेईन- जय भगवान गोयल
छत्रपती शिवाजी महाराज काम करायचे त्याप्रमाणेच नरेंद्र मोदी काम करत आहेत.
नवी दिल्ली: 'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' या वादग्रस्त पुस्तकाला मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागल्यानंतर या पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांनी एक पाऊल मागे घेण्याची भूमिका घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराज काम करायचे त्याप्रमाणे नरेंद्र मोदी काम करत असल्याने आपण त्यांची तुलना महाराजांशी केल्याचे गोयल यांचे म्हणणे आहे. मात्र, यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी पुस्तक मागे घ्यायला तयार आहे, असे गोयल यांनी सांगितले.
शिवाजी महाराज ज्याप्रमाणे राज्यातील माता-बहिणींची चिंता करायचे तसेच मोदी देशातील माता, बहिणींच्या सुरक्षेसाठी काम करत आहेत. आज प्रत्येक महिलेला आपण सक्षम असल्याचे वाटते. छत्रपती शिवाजी महाराज काम करायचे त्याप्रमाणेच नरेंद्र मोदी काम करत आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात भारताचा सन्मान वाढल्याचेही यावेळी गोयल यांनी सांगितले.
शरद पवारांना 'जाणता राजा' म्हटलेलं कसं चालतं?
गेल्या अनेक वर्षांपासून भारताला कुणीही वाली नव्हता. देशाच्या संसदेवरही दहशतवादी हल्ला झाला. मुंबईतही दहशतवादी हल्ला झाल्याचेही आपण पाहिले आहे. मात्र, नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यापासून देशामध्ये एकही दहशतवादी हल्ला झालेला नाही. पाकिस्तानने जम्मू -काश्मीरमध्ये घुसून हल्ला केला होता. या हल्ल्याला पाकिस्तानमध्ये घुसून मोदी सरकारने प्रत्युत्तर देण्याचे काम केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये जगभरात भारताचा सन्मान वाढला आहे, असा दावा यावेळी गोयल यांनी केला.
दरम्यान, यावेळी गोयल यांना तुम्ही पुस्तक मागे घेणार, का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर गोयल यांनी म्हटले की, पुस्तक बाजारात आले आहे. पक्ष सांगेल त्याप्रमाणे करेन, असे सांगत गोयल यांनी एक पाऊल मागे घेतले.