नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुरू असलेला आणि साऱ्या जगाचं लक्ष लागलेल्या कुलभूषण जाधवांच्या खटल्यात भारताचा मोठा विजय झालाय. पाकिस्तानचे सर्व युक्तीवाद फेटाळण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, १६ पैंकी १५ न्यायाधिशांनी भारताच्या बाजूनं निकाल दिलाय. कुलभूषण जाधवांना राजनैतिक मदत देण्याचा मार्ग मोकळा झालाय. तसंच त्यांच्या फाशीच्या शिक्षेवर स्थगिती कायम ठेवण्यात आलीय. या सुनावणी दरम्यान न्यायालयानं पाकिस्तान मानवाधिकारांवरूनही फटकारलं. कुलभूषण जाधवांच्या प्रकरणात मानवाधिकारांचं उल्लंघन झाल्याचा ठपका न्यायालयानं पाकिस्तानवर ठेवलाय. तसंच व्हिएन्ना कराराचं पाकिस्तानकडून उल्लंघन झाल्याचा उल्लेखही आंतराराष्ट्रीय न्यायालयानं केलाय.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निकालानंतर सोशल मीडियावरून आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. सत्य जाणून निर्णय दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आयसीजेला शुभेच्छा दिल्यात. कुलभूषण जाधव यांना न्याय मिळेल, अशीही खात्रीही त्यांनी यावेळी व्यक्त केली. 




या निर्णयानंतर माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाचं स्वागत केलंय. भारताच्या या विजयाचं श्रेय त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना देत शुभेच्छा दिल्यात. 'कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचं मनापासून स्वागत करते. हा भारतासाठी मोठा विजय आहे'. सोबतच, 'कुलभूषण जाधव प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देते' असंही त्यांनी यावेळी म्हटलं. 



आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांची बाजू मांडणारे वकील हरीश साळवे यांच्या प्रयत्नांचंही सुषमा स्वराज यांनी 'आयसीजेसमोर प्रभावीरित्या आणि सफलतेनं मांडण्याबद्दल हरीश साळवे यांचे आभार' असं म्हणत कौतुक केलंय.