नवी दिल्ली: 'देश के गद्दारोंको.... गोली मारो' या वादग्रस्त घोषणेमुळे अडचणीत आलेले केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनी जाहीर आव्हान दिले आहे. मी अनुराग ठाकूर सांगतील, त्याठिकाणी यायला तयार आहे. त्याठिकाणी तुम्ही मला गोळ्या घालून दाखवाच, असे ओवेसी यांनी म्हटले आहे. तुमच्या वक्तव्याने माझ्या मनात किंचीतशीही भीती निर्माण झालेली नाही. कारण आमच्या माता-भगिनी देशाला वाचवण्यासाठी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्या आहेत, असे ओवेसी यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे आता भाजपकडून ओवेसी यांना कशाप्रकारे प्रत्युत्तर देण्यात येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने अनुराग ठाकूर यांना वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली. यावर स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांना ३० जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.



रिठाला विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मनीष चौधरी यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर अनुराग ठाकूर, हंसराज अहिर यांच्यासह भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी अनुराग ठाकूर यांनी भाषणादरम्यान 'देश के गद्दारो को' असे उच्चारताच जमावाने 'गोली मारो' अशा घोषणा दिल्या. व्यासपीठावरील एका नेत्यानेही हीच घोषणा दिली. मात्र, अनुराग ठाकूर यांनी लगेच त्या नेत्याला रोखले. मात्र, भाजपच्या नेत्यांना ठरवून जमावाकडून अशाप्रकारच्या घोषणा वदवून घेतल्याचा विरोधकांचा आरोप आहे.