तेव्हा सरकारने माझे ऐकले नाही आणि संकट ओढावले- राहुल गांधी
मी सरकारला वेळोवेळी सावध केले मात्र सरकारने माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले.
नवी दिल्ली: मोदी सरकारला मी कोरोना आणि अर्थव्यवस्थेच्या परिस्थितीबाबत सावध केले होते. मात्र, त्यांनी माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. यानंतर देशावर संकट आले. आताही मी चीनच्या बाबतीत केंद्र सरकारला वारंवार सावध करत आहे. मात्र, सरकार आतादेखील माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले.
मोदींकडे दूरदृष्टीच नसल्यामुळेच चीन आपल्यावर शिरजोरी करु पाहतोय- राहुल गांधी
गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर बहुतांश राजकीय नेत्यांनी सरकारला पाठिंबा दिला असताना राहुल गांधी आणि काँग्रेस यांच्याकडून मोदी सरकारला वारंवार प्रश्न विचारले जात आहेत. मोदी सरकारच्या नाकर्तेपणामुळे चिनी सैन्याने भारतीय भूमी बळकावल्याचा दावाही काँग्रेसने केला होता. दरम्यानच्या काळात राहुल गांधी यांनी भारत-चीन मुद्द्यावर अनेक प्रश्न उपस्थित करुन सरकारला जेरीस आणले होते. त्यामुळे भाजप नेते राहुल गांधी यांच्याविरोधात प्रचंड आक्रमक झाले होते.
कालच राहुल गांधी यांनी ट्विट करुन मोदी सरकारच्या चीनविषयक धोरणावर ताशेरे ओढले होते. चीनचा सामना करताना आपल्याला मानिसक कणखरपणा दाखवणे गरजेचे आहे. मात्र, पंतप्रधान मोदी यांच्याकडे त्यासाठीची अशी दूरदृष्टीच नाही. त्यामुळे आज चीनला भारतात घुसखोरी करणे शक्य झाल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले होते. तसेच आपल्याला सीमावाद हाताळण्याची पद्धत बदलावी लागेल. त्यासाठी आपली मानसिकत बदलायला पाहिजे, असेही राहुल गांधी यांनी सांगितले होते.