तुझं डोक फोडेन, पत्रकाराच्या प्रश्नावरून रागावलेल्या खासदाराची प्रतिक्रिया
पुढच्यावर्षी होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही कोणासोबत आहात, अशा आशयाचा प्रश्न विचारल्यावर अजमल यांना राग आला.
गुवाहाटी - पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर त्यांना उत्तर न देता त्यांच्यावरच चिडण्याची अनेक उदाहरणे सातत्याने घडत असतात. असेच एक उदाहरण बुधवारी गुवाहाटीमध्ये घडले. एआययुडीएफचे प्रमुख आणि खासदार बदरुद्दीन अजमल यांना पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने प्रश्न विचारल्यावर त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी कॅमेऱ्यासमोरच पत्रकाराच्या हातातील बूम फेकून दिला आणि त्याच्यावरच भडकले. त्याचे डोकं फोडण्याची धमकीही अजमल यांनी दिल्याचे एएनआयने म्हटले आहे. पुढच्यावर्षी होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही कोणासोबत आहात, अशा आशयाचा प्रश्न विचारल्यावर अजमल यांना राग आला.
अजमल यांनी लगेचच आक्षेपार्ह शब्दांत पत्रकाराशी बोलण्यास सुरुवात केली. त्यांना राग आल्याचे बघितल्यावर पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या पक्षाच्या इतर नेत्यांनी अजमल यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण ते कोणाचेच ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे चित्रीकरणावरून दिसते. चिडलेल्या अवस्थेतच त्यांनी संबंधित पत्रकाराला तुझं डोकं फोडेन, अशी धमकीच दिली. या प्रकारामुळे काहीवेळ घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान या घटनेनंतर संबंधित पत्रकाराने पोलिस ठाण्यात अजमल यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
दक्षिण सलमारा जिल्ह्यातील पंचायत समिती निवडणुकीत विजयी उमेदवारांचा सत्कार बदरुद्दीन अजमल यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी स्थानिक वाहिनीच्या एका पत्रकाराने त्यांना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एआययुडीएफच्या आघाडीबद्दल विचारले. त्यावेळी त्यांनी आम्ही विरोधकांच्या महाआघाडीसोबत असल्याचे सांगितले. यानंतर संबंधित पत्रकाराने पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीमध्ये कोणता पक्ष विजयी होतो आहे, हे बघून नंतर तुम्ही तुमची भूमिका बदलू शकता का, असा प्रश्न विचारला. यावरून अजमल यांना राग आला आणि त्याने पत्रकाराच्या हातातील बूम फेकून दिला आणि त्याला धमकावले.