India vs Pakistan Match Or Modi Swearing In Ceremony: भारतीयांना राजकारण, क्रिकेट आणि मनोरंजन या तीन क्षेत्रांबद्दल विशेष रस असल्याचं सांगितलं जातं. भारतीय लोक या तिन्ही विषयांवर कितीही वेळ बोलू शकतात असंही म्हटलं जातं. त्यामुळेच आजचा दिवस म्हणजेच 9 जून 2024 चा दिवस हा भारतीयांसाठी खासच ठरणार आहे. यामागील कारण म्हणजे एकीकडे दिल्लीत नरेंद्र मोदी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेते म्हणून तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. तर दुसरीकडे आज सायंकाळी न्यूयॉर्कमध्ये टी-20 वर्ल्ड कपच्या स्पर्धेत भारतीय संघ पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार या दोन्ही गोष्टी अगदी काही मिनिटांच्या फरकाने घडणार आहेत. पंतप्रधान मोदी सायंकाळी सव्वासात वाजता दिल्लीत पंतप्रधानपदाची शपथ घेतील तर आठ वाजता न्यूयॉर्कमध्ये प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल. अशावेळेस नेमकं काय लाइव्ह पहावं असा प्रश्न अनेक भारतीयांना पडला असला तरी काँग्रेसच्या एका नेत्याने मोदींच्या शपथविधीपेक्षा आपण भारत-पाकिस्तान सामन्याला प्राधान्य देऊ असं रोकठोक विधान केलं आहे. 


नेमकं काय म्हणाले थरुर?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी शनिवारी नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यावरुन खोचक टोला लगावला. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला आधीच्या दोन निवडणुकींप्रमाणे स्पष्ट बहुमत मिळवता आलेलं नाही. आपण या सोहळ्याला उपस्थित राहण्याऐवजी भारत-पाकिस्तान सामना पाहू असं म्हटलं आहे. थरुर यांना या सोहळ्याला आमंत्रण देण्यात आलेलं नाही यासंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी हे विधान केलं. "मला शपथविधी सोहळ्याला बोलावण्यात आलेलं नाही. त्यामुळे मी (भारत विरुद्ध पाकिस्तान) मॅच बघेन," असं थरुर यांनी मोदींच्या शपथविधी सोहळ्यासंदर्भातील प्रश्नावर म्हटलं.


हे परदेशी पाहुणे येणार


मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याने वेगवेगळ्या देशांच्या प्रमुख नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. भारतीय उपखंडातील अनेक देशांच्या नेत्यांना विशेष आमंत्रण करण्यात आलेलं आहे. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष, मालदीवचे राष्ट्राध्यक्ष, सिशेल्सचे उपपंतप्रधान, बांगलादेशच्या पंतप्रधान, मॉशिएसचे पंतप्रधान, नेपाळचे पंतप्रधान, भुतानचे पंतप्रधानांनी आमंत्रण स्वीकारलं असून ते मोदींच्या शपथविधीला उपस्थित राहणार असल्याची माहिती परराष्ट्रमंत्रालयाने दिली. 


नक्की वाचा >> India Predicted XI vs Pakistan: इच्छा असूनही पाकिस्तानविरुद्ध 'या' 2 दोघांना मैदानात उतरवता येणार नाही


मालदीवचे पंतप्रधान येत असल्याचा आनंद


भारत आणि मालदीवमधील ताणलेले संबंध लक्षात घेत थरुर यांनी मालदीवच्या पंतप्रदानांनी देलेलं आमंत्रण महत्त्वाचं असल्याचं म्हटलं. या निमित्ताने दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांची भेट होईल असं थरुर म्हणालेत. पाकिस्तान वगळता सर्वांना भारताने आमंत्रित केलं आहे यामधून एक संदेश जात असल्याचंही थरुर आवर्जून म्हणाले. "मालदीव किमान इथे येऊन संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. मागील काही कालापासून त्यांचे आणि आपले हितसंबंध जुळत नव्हते. त्यांचे विद्यमान पंतप्रधान पहिल्यांदाच भारतात येत आहे. या दौऱ्यात इतरही काही बैठका होतील आणि ते या संधीचा फायदा घेतील असं मला वाटतं," असं थरुर म्हणाले. "मोदींच्या शपथविधीच्या माध्यमातून हे चांगलं काम होत आहे. मात्र यावेळेस एका देशाला आमंत्रित करण्यात आलेलं नाही. त्यांनी पाकिस्तानला आमंत्रित केलेलं नाही. त्यामधून ते एक संदेश देऊ पाहत आहेत," असं थरुर म्हणाले.