अलविदा! मिग-२७ विमानाला सोमवारी अखेरचा निरोप
कारगिल युद्धात उंच पर्वतांच्या शिखरावर असलेल्या घुसखोरांच्या तळांवर यशस्वी हल्ला करण्याचे काम मिग - २७ ने चोखपणे पार पाडले होते.
नवी दिल्ली: गेल्या अनेक दशकांपासून भारतीय वायू दलाची शान असलेले मिग-२७ हे लढाऊ विमान येत्या २७ डिसेंबरला निवृत्त होणार आहे. जोधपूर विमानतळावर सन्मानाने MiG 27 ला एका शानदार कार्यक्रमाद्वारे निरोप दिला जाईल. स्क्वॉड्रन अधिकाऱ्यांसह विमानाशी संलग्न असलेले वायुसेनेचे अन्य सेवारत आणि सेवानिवृत्त कर्मचारी या निरोप समारंभात भाग घेतील. यावेळी मिग-२७ अखेरच्यावेळी हवेत झेपावेल.
मूळ रशियन बनावटीच्या असलेल्या तंत्रज्ञान हस्तांतरण करारानंतर भारताने तयार केलेल्या मिग - २७ ला 'बहादूर' या टोपण नावानेही ओळखले जाते.
आईशप्पथ! पाकिस्तानातील गुगल सर्चमध्ये भारतीय वायूदल टॉप ट्रेंडमध्ये
जमिनीवर हल्ला ( ground attack ) करण्याची जबाबदारी या लढाऊ विमानावर होती. १९८१ च्या सुमारास हे लढाऊ विमान भारतीय वायूदलात दाखल झाले. यानंतर भारतात १५० पेक्षा जास्त मिग - २७ विमानांची निर्मिती करण्यात आली. कारगिल युद्धात उंच पर्वतांच्या शिखरावर असलेल्या घुसखोरांच्या तळांवर यशस्वी हल्ला करण्याचे काम मिग - २७ ने चोखपणे पार पाडले होते.
भारतीय वायूदलातून निवृत्त झालेल्या विमानांना वायूदलाच्या बेस डेपोमध्ये पाठवले जाते. तर काही विमाने भारतीय वायूदलाच्या शौर्याच्या प्रतिक म्हणून जपून ठेवली जातात. दरम्यान, बेस डेपोमध्ये रवानगी झालेली विमाने इतर देशांनाही दिली जाऊ शकतात. जगातील बहुतांश देशांनी मिग-२७ चा वापर बंद केला होता. त्यामुळे आता भारतीय वायूदलातून निवृत्त झाल्यानंतर हे विमान इतिहासजमा होईल.