गॉर्ड ऑफ ऑनर देताना बेशुद्ध झाला जवान, पंतप्रधान मोदी भेटीसाठी धावले
जवान झाला बेशुद्ध, मोदींनी भेटून दिला हा सल्ला
नवी दिल्ली : सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॅनी फार सोमवारी भारत दौऱ्यावर आले. यावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यादरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित होते. डॅनी फार द्विपक्षीय दौऱ्यासाठी भारताता आले आहेत. राष्ट्रपती भवनमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं. राष्ट्रपती भवनमध्ये जेव्हा राष्ट्राध्यक्ष डॅनी फार यांना गार्ड ऑफ ऑनर दिला जात होता तेव्हा भारतीय वायुदलाचा एक जवान बेशुद्ध झाला.
गार्ड ऑफ ऑनर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या जवानाची भेट घेण्यासाठी गेले. पंतप्रधानांनी तब्येतीची काळजी घेण्याचं सल्ला यावेळी त्या जवानाला दिला. पंतप्रधान कार्यालयाच्या सूत्रांच्या माहितीनुसार काही मिनिटं त्या जवानासोबत बोलल्यानंतर पंतप्रधान मोदी आपल्या निवासस्थानी निघाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सेशल्सचे राष्ट्राध्यक्ष डॅनी फॉर यांच्या बैठकीत दोन्ही देशांमध्ये 6 करार केले जाणार आहेत. भारताने सेशल्सला समुद्र किनाऱ्याची सुरक्षा क्षमता वाढवण्यासाठी 10 कोटी डॉलरचं कर्ज देण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधानांनी म्हटलं की, 'आम्ही एकमेकांच्या अधिकारांना मान्यता देत अजम्प्शन आयलँड योजनेवर एकत्र काम करण्यासाठी तयार झालो आहोत.' सेशल्सचे राष्ट्राध्यक्ष डॅनी फॉर यांनी म्हटलं की, 'अजम्प्शन आयलँड योजनेवर चर्चा झाली. आम्ही एकमेकांच्या हिताचा विचार करत एकत्र काम करु.'