श्रीनगर : साधारण महिन्याभरापूर्वी जवळपास दोन दिवस पाकिस्तान सैन्यदलाच्या ताब्यात असणारे भारतीय वायुदलातील विंग कमांडर अभिनंदन वर्थमान त्यांच्या स्क्वाड्रन अर्थात हवाई दलाच्या तळामध्ये परतले आहेत. वैद्यकिय रजेसाठी ते श्रीनगर येथे असणाऱ्या त्यांच्या स्क्वाड्रनला रवाना झाले. चार आठवड्यांच्या या रजेच्या काळात कुटुंबासोबत राहण्याचा पर्यायही त्यांना देण्यात आला होता. पण, त्यांनी श्रीनगरलाच जाण्यास प्राधान्य दिलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खुद्द अभिनंदन यांनी चेन्नईस्थित त्यांच्या कुटुंबासोबत न राहता श्रीनगरमध्ये असणाऱ्या त्यांच्या स्क्वाड्रनसोबत राहण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. चार आठवड्यांच्या या वैद्यकिय रजेनंतर विंग कमांडर अभिनंदन यांच्या प्रकृतीविषयीचा अहवान वैद्यकिय समितीकडून देण्यात येईल. ज्यानंतर ते लढाऊ विमानाच्या कॉकपीटमध्ये पुन्हा एकदा जाऊ शकणार की नाही, हे स्पष्ट होणार आहे. लवकरात लवकर कॉकपीटमध्ये परतण्याचा निर्धार स्वत: अभिनंदन यांनीच व्यक्त केल्यामुळे आता, तो दिवस दूर नसल्याचच स्पष्ट होत आहे. 


सूत्रांचा हवाला देत एएनआयने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार 'सध्याच्या घडीला विंग कमांडर अभिनंदन यांना त्यांच्या साथीदारांसोबतच आणि मशिन्स अर्थात लढाऊ विमानं आणि वायुदलाच्या एकंदर वातावरणात श्रीनगरमध्ये राहायचं आहे आणि तसाच निर्णय त्यांनी घेतला आहे. या वैद्यकिय रजेनंतर त्यांना नवी दिल्ली येथे परतावं लागणार आहे.'


बालाकोट येथील एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तान सैन्यदलाच्या एफ- १६ विमानांनी भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी या घुसखोरीचं उत्तर देण्यासाठी भारताकडूनही महत्त्वाची पावलं उचलण्यात आली. याच कारवाईत भारतीय वायुदलाच्या मिग-२१ या विमानावर पाकिस्तानकडून निशाणा साधला गेला. विंग कमांडर अभिनंदन यांच्या हाती मिगची जबाबदारी होती, त्यांनीही पाकिस्तानच्या एफ-१६ ला दणका दिला होता. पण, अभिनंदन यांच्या लढाई विमानावर मारा झाल्यामुळे ते मिग अपघातग्रस्त झालं. या कारवाईदरम्यान पाकिस्तान सैन्यदलाने ताब्यात घेतलं. १ मार्च रोजी रात्री, त्यांना भारताकडे सोपवण्यात आलं. 


पाकिस्तानच्या ताब्यात असणाऱ्या अभिनंदन यांना देशात परत आणण्यासाठी सैन्यदल आणि केंद्राकडून तातडीने महत्त्वाचे निर्णय घेत कठोर पावलं उचलण्यात आली, परिणामी पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन यांना भारताकडे सोपवलं. अभिनंदन पाकिस्तानातून भारतात परतल्यानंतर सर्वच देशवासियांनी सुटकेचा नि:श्वास सोडत त्यांचं स्वागत केल्याचं पाहायला मिळालं होतं.