भारतीय वायूदलाची ताकद वाढणार; ३३ अत्याधुनिक विमानांच्या खरेदीचा प्रस्ताव
फ्रान्स सरकारदेखील आणखी ३६ राफेल फायटर विमानांच्या विक्रीसाठी उत्सुक
नवी दिल्ली: भारतीय हवाईदल लढाऊ विमानांची कमतरता आता भरून काढण्याच्या तयारीत आहे. यासाठी वायुसेनकडून ३३ लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे समजते. या प्रस्तावानुसार हवाईदल २१ ‘मिग-२९’ व १२ ‘सुखोई -३०’ अशी एकूण ३३ लढाऊ विमाने खरेदी केली जाणार आहेत. वायुसेनेच्या या प्रस्तावास जर मंजूरी मिळाली तर वायुदलास मोठी बळकटी मिळणार आहे.
याशिवाय, फ्रान्स सरकार भारताला आणखी काही राफेल विमाने विकण्यासाठी उत्सुक आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, फ्रान्स आणखी ३६ राफेल फायटर विमानांची विक्री करण्याचा गांभीर्याने विचार करत आहे. याशिवाय, हेलिकॉप्टर्स, पाणबुडयांचा विक्री करारासाठीही फ्रान्स आग्रही असल्याचे वृत्त आहे.
अखेर प्रतिक्षा संपणार; 'या' दिवशी वायूदलाला मिळणार पहिले राफेल विमान
भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताची ही कृती महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पाकिस्तानकडूनही गुरुवारी गझनवी या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली होती. गझनवी हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र २९० किलोमीटर अंतरावरील लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकते. तसेच या क्षेपणास्त्राद्वारे विविध स्फोटके वाहून नेता येऊ शकतात.