भारतीय वायुदलाने LOC ओलांडली, पाकिस्तानी दहशतवादी तळांचा नायनाट
हो, भारताने हल्ला केला; परराष्ट्र सचिवांची अधिकृत माहिती
श्रीनगर : भारतीय वायुदलाच्या लढाऊ विमानांनी मोठी कारवाई करत नियंत्रण रेषा ओलांडली आहे. मंगळवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास मिराज २००० ही लढाऊ विमानं पाकिस्तानची नियंत्रण रेषा ओलांडून गेली आणि त्यांनी दहशतवादी तळांचा नायनाट केला आहे. यामध्ये जैशच्या अनेक दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला असून, दहशतवादी संघटनांच्या कंट्रोल रुमचाही नायनाट करण्यात आला आहे. बालाकोट, चकोटी आणि मुजफ्फराबाद येथील दहशतवादी तळ नष्ट करण्यात आल्याची माहिची सूत्रांनी दिली आहे.
- पाकव्याप्त काश्मीरमध्ये जात दहशतवादी तळांवर हल्ला केल्याची अधिकृत माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिवांनी दिली आहे.
-हल्ल्याविषयी अधिक माहिती देण्यासाठी भारताच्या परराष्ट्र मंत्र्यालयाची बैठक
-कच्छ सीमेनजीक असणाऱ्या भागात पाकिस्तानकडून पाठवण्यात आलेलं ड्रोन भारताकडून पाडण्यात आलं
- ३ दहशतवादी तळ नष्ट करण्यात वायुदलाला यश
- भारतीय वायुदलाच्या लढाऊ विमानांचा ताफा पाहून प्रत्युत्तरासाठी पुढे आलेल्या पाकिस्तानी लढाऊ विमानांची माघार - सूत्र
- आंतरराष्ट्रीय सीमेनजीक असणाऱ्या सर्व हवाई तळांना सतर्कतेचा इशारा. पाकिस्तानकडून प्रत्युत्तर येण्याची शक्यता पाहता घेतली जातेय काळजी.
-गृहमंत्री, संरभणमंत्री, एनएसएची थोड्याच वेळात बैठक
- सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पंतप्रधानांना दिली हल्ल्याची माहिती.
- पाकिस्तानातही बैठकीचं सत्र सुरू- सूत्रं
- नेतेमंडळींच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात. राहुल गांधींनी वायुदलाच्या सैनिकांना केला सलाम.
- पुलवामा हल्ल्यानंतर १२ दिवसांत कारवाई.
-मंत्रीमंडळाच्या बैठकीला सुरुवात
पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेपाशी असणाऱ्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर हा भारतीय वायुदलाने हल्ला केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार जवळपास १००० किलो स्फोटकांचा वापर करत हे तळ नष्ट करण्यात आले आहेत. जैशच्या तळांवर केलेला हा हल्ला पाकिस्तानचा गाफील ठेवू करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. भारतीय वायुदलाच्या मिराज २००० या १२ लढाऊ विमानांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. वॉर मेमोरियलच्या सरावाच्या निमित्ताने या विमानांनी उड्डाण केल्याची माहिती समोर येत आहे.
जम्मू-काश्मीरमधल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर १२ दिवसांनी पाकिस्तानला हा झटका दिला आहे. पुलवामातील अवंतीपोरामध्ये करण्यात आलेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. दरम्यान, ज्या लढाऊ विमानाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन ही कारवाई केली हे त्या, मिराज २००० या लढाऊ विमानाची एकूण कार्यक्षमता पाहता पुलवामा हल्ल्याची ही परतफेड ठरत आहे. हवाई मारा करत शत्रूचा नायनाट करण्याची भारतीय वायुदलाची ही कारवाई आणि त्याविषयीच्या अधिक माहितीच्या प्रतिक्षेत सारा देश असून याविषयीच्या अधिकृत वृत्ताकडे साऱ्यांच्या नजरा आहेत.
पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी ट्विट करत याविषयीची माहिती दिली. भारताकडून आपल्या राष्ट्रात हल्ला झाल्याचं म्हणत त्यांनी आपल्याला कोणतंही नुकसान झालं नसल्याचं पाकिस्तानकडून भासवण्यात येत आहे. मुजफ्फराबाद सेक्टरमधून भारतीय वायुदलाची विमानं पाकिस्तानात आली. पण, त्यावेळी पाकिस्तानकडूनही त्यांच्या हल्ल्याचं उत्तर देण्यात आल्याचं गफूर यांनी ट्विटमध्ये म्हणत पाकिस्तानने दिलेलं उत्तर पाहता परतीच्या वाटेवर निघालेल्या भारतीय वायुदलाच्या विमानांनी बालाकोट भागात बॉम्ब हल्ले केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मुळात या हल्ल्यात कोणतंही नुकसान न झाल्याचं पाकिस्तानकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या हल्ल्याच्या अधिकृत माहितीकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.