मुंबई : भारतीय वायुदलाच्या सेवेत रुजू असणाऱ्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या कार्याचा गौरव भारत सरकारकडून करण्यात येणार आहे. 'एएनआय' या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत वीर चक्र देऊन गौरवण्यात येणार आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय वायुदलातील स्क्वाड्रन लीडर मिंटी अग्रवाल यांनाही युद्ध सेवा मेडल देऊन गौरवण्यात येणार आहे. भारतीय वायुदलाकडून पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट येथे असणाऱ्या दहशतवादी तळांवर करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकनंतर २७ फेब्रुवारीला झालेल्या हवाई चकमकीत भारतीय वायुदलासाठी फायटर कंट्रोलर म्हणून त्यांनी पार पाडलेल्या अत्यंत जबाबदार आणि प्रशंसनीय भूमिकेसाठी त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.  


पुलवामा येथे सीआरपीएफ जवान जात असणाऱ्या वाहनांच्या ताफ्य़ावर करण्यात आलेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची परतफेड म्हणून भारतीय वायुदलाकडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन एअर स्ट्राईक करण्यात आला. दहशतवादी तळ उध्वस्त करत भारतीय संरक्षण यंत्रणांनी या हल्ल्याचं सडेतोड उत्तर दिलं. ज्यानंतर पाकिस्ताननेही प्रत्युत्तर म्हणून भारतीय हवाई हद्दीत लढाऊ विमानांच्या सहाय्याने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. 


पाकिस्तानचा हा प्रयत्न हाणून पाडत असतानाच भारतीय वायुदलाचं साहस पाहायला मिळालं. अभिनंदन वर्धमान आणि मिंटी अग्रवाल या दोन्ही अधिकाऱ्यांनी इतर वायुदल अधिकाऱ्यांच्या साथीने या हवाई कारवाईदरम्यान अद्वितीय अशा साहसाचं प्रदर्शन केलं होतं. ज्याकरता त्यांच्या या साहसाला गौरवरुपी शाबासकीची थाप मिळणार आहे. 


शौर्य पुरस्कारांमध्ये भारतीय सैन्यदलातील राष्ट्रीय रायफल्स (महार)च्या प्रकाश जाधव यांना मरणोत्तर किर्ती चक्रने गौरवण्यात येणार आहे. जम्मू- काश्मीर येथील येथील सैन्यदलाच्या कारवाईमध्ये दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांना किर्ती चक्र प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय एकूण आठ सैन्यदल जवानांना शौर्य चक्र प्रदान करण्यात येणार आहे, ज्यामध्ये पाचजणांचा मरणोत्तर गौरव होत आहे.