नवी दिल्ली : सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणता विषय कधी, कुठे आणि कशा पद्धतीनं व्हायरल होईल याचा काही नेम नाही. अनेकांच्या आठवणी, कोणाचे अनुभव याच सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होतात. सध्या याच माध्यमातून एक अनोखी प्रेमकहाणी नेटकऱ्यांची मनं जिंकत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निमित्त ठरत आहे तो म्हणजे एक फोटो. बरं हा फोटोही काही साधासुधा नाही, कारण या फोटोमध्ये झळकलेली 'ती' आहे, एक आयएएस अधिकारी. बसला ना तुम्हालाही धक्का? 


IAS ऑफिसर चांदनी चंद्रन यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या जीवनात घडलेला एक रंजक किस्सा सर्वांच्या भेटीला आणला आहे. 2016 मध्ये देशातून केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या हजारो परीक्षार्थींपैकी एक होत्या चांदनी चंद्रन. 2015 मध्ये त्यांनी ही परीक्षा दिली होती. निकालाच्या प्रतीक्षेत असतानाच त्यांच्यासोबत असं काही घडलं की, एकाएकी साऱ्यांच्याच नजरा त्यांच्यावर खिळल्या. 


परीक्षेचा निकाल नेमका काय असेल याचं दडपण आलेलं असतानाच त्यावेळी चांदनी यांच्या प्रियकरासोबत (अरुण सुदर्शन ) सहजच भटकण्यासाठी म्हणून बाहेर पडल्या. त्यानंतर जे काही घडलं ते पूर्णपणे अनपेक्षित होतं.


ट्विट करत त्यांनी लिहिलं, '10 मे 2016 चा तो दिवस होता. लोकसेवा आयोग परीक्षा 2015 चे निकाल येणार होते. मला दडपण आलं होतं. त्यामुळं मी सहजच अरुण सुदर्शनसोबत बाहेर भटकत होते. मी परीक्षा उत्तीर्ण झाले नाही. दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांमध्ये परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांच्या छायाचित्रांनी भरली होती आणि टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रानं आमचा हा फोटो छापला होता'. 



बरसणाऱ्या पावसातून चालत जात असताना चांदनी आणि त्यांच्या प्रियकराचा फोटो अशा पद्धतीनं छापून येणं हे पूर्णपणे अनपेक्षित होतं. त्यावेळी चांदनी यांच्या प्रियकराने (सध्या त्यांचा पती असणाऱ्या अरुण सुदर्शन) वृत्तपत्राच्या कार्यालयात यासंदर्भातील तक्रार केली होती. कारण, त्यावेळी ही जोडी विवाहबंधनात अडकलेली नव्हती, ज्यामुळं चर्चा होणं स्वाभाविक होतं.


फोटोमध्ये आक्षेपार्ह असं काहीच नव्हतं... 


छापून आलेल्या त्या फोटोमध्ये आक्षेपार्ह असं काहीच नव्हतं. पण, तरीही त्यामुळं उदभवणाऱ्या चर्चांमुळं त्यांच्या मनात भीती होती. परीक्षा त्यावेळी उत्तीर्ण होऊ न शकलेल्या चांदनी यांच्यासोबत भर पावसात चालणाऱ्या त्या व्यक्तीनं त्यांना पावलोपावली साथ दिली होती. याच साथीच्या बळावर अखेर त्या लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आणि आयएएस अधिकारी होण्याचं निर्धारित लक्ष्य गाठलं. ज्यानंतर चांदनी आणि त्यांच्या प्रियकरानं विवाहबंधनात अडकत एक नवा प्रवास सुरु केला. 


अवघे पाऊणशे वयमान! ; पंच्याहत्तरीत अमेरिकेच्या धर्तीवर अमरावतीच्या आजोबांची दमदार कामगिरी 


 


जीवनातील अतिशय रंजक असा हा किस्सा आणि फोटोबाबत आठवणी जागवत असतानाच चांदनी यांच्या पतीनं हा फोटो टीपणाऱ्या छायाचित्रकाराला गाठलं. ज्यानंतर छायाचित्ररकारानं 'त्या' तक्रारीमुळं हे फोटो प्रकरण लक्षात ठेवत या जोडीला फोटोची प्रत पाठवून दिली. हे सारंकाही पाहून चांदनी यांनी छायाचित्रकाराचे आभारही मानले. 


सोशल मीडियाच्या माध्यमातून एक अनोखी प्रेमकहाणी नेटकऱ्यांच्या भेटीला येत असतानाच नियती नेमकी काय काय करु शकते यावर अनेकांचाच विश्वास बसला.


व्हायरल होणारा हा फोटो पाहून तो टीपणाऱ्या छायाचित्रकारानंही चांदनी आणि त्यांच्या पतीला शुभेच्छा देत तब्बल 5 वर्षांनंतर आपल्याला या फोटोमागची कहाणी उलगडली असल्याची प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त केला.