अवघे पाऊणशे वयमान! ; पंच्याहत्तरीत अमेरिकेच्या धर्तीवर अमरावतीच्या आजोबांची दमदार कामगिरी

वाढदिवसानिमित्त मुलांकडून मिळालं अनोखं आणि अविस्मरणीय गिफ्ट   

Updated: Jul 1, 2021, 12:32 PM IST
अवघे पाऊणशे वयमान! ; पंच्याहत्तरीत अमेरिकेच्या धर्तीवर अमरावतीच्या आजोबांची दमदार कामगिरी  title=
आजोबांच्या जीवनातील थरारक अनुभव

अनिरुद्ध दवाळे, अमरावती : वर्षभराहून अधिक काळापासून आपल्या आयुष्यात कोरोना नावाचं संकट अनेक रुपांनी धडकत आहे. या संकटाची तीव्रता कमी जास्त प्रमाणात प्रत्येकाच्याच जीवनावर परिणाम करत आहे. असं असलं तरीही यामध्येच एखादी सकारात्मक किंवा वेगळी माहिती नकळतच मनाला दिलासाही देत आहे. आयुष्य सुंदर आहे फक्त त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन सुंदर हवा असा संदेश आजुबाजूला घडणाऱ्या घटना आणि वावरणाऱ्या व्यक्ती देत आहेत. 

सध्या अमरावतीमधील एका आजोबांनी घेतलेला एक थरारक अनुभव याचीच प्रचिती देत आहे. कोरोनाच्या महामारीत अनेकांनी आपला जीव गमावला, कोरोनाच्या भीतीमुळे अनेकजणांनी आपल्या आप्तस्वकीयांना देखील दूर सारल्याच्या दुर्दैवी घटना समोर आल्या. परंतु अशातच अनेक सकारात्मक बाबी देखील समोर आल्या. यापैकीच एक घटना अमरावतीमध्ये घडली. 

अमरावतीमध्ये चार महिन्यांपूर्वी कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे आपले आई वडील या विषाणूनं बाधित होऊ नयेत म्हणून, काळजीपोटी अमेरिकेत राहणाऱ्या मुलाने म्हणजेच अनिरुद्ध पावडे यांनी आपल्या आई वडिलांना अमेरिकेत नेण्याचा निर्णय घेतला. 

अमेरिकेत गेल्यानंतर अनिरुद्ध पावडे यांनी आपले वडील विजय पावडे यांना त्यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त एक खास भेट देण्याचा निर्णय घेतला. ही भेट त्यांच्या वडिलांच्या म्हणजेच विजय पावडे यांच्या जीवनातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण, वयाच्या 75 व्या वर्षी विजय पावडे यांनी स्कायडायविंग करत विस्तीर्ण आभाळाचं वेगळं रुप पाहिलं आहे.

नोकरीच्या निमिताने विजय पावडे यांची मुलं (दोन मुली आणि एक मुलगा) गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेत राहतात. कॅलिफोर्नियफोर्नियामध्ये त्यांचं वास्तव्य. तर, विजय पावडे हे अमरावतीच्या बुधवारा परिसरात राहतात. अशा या अमरावतीच्या आजोबांनी थेट अमेरिकेच्याच धर्तीवर हा थरारक अनुभव घेतला आहे. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी आपल्या वडिलांना 13 हजार फुट उंचीवरून विमानातून स्कायडायविंग करत जणू आपल्या विशलिस्टमधील आणखी एका गोष्टीवर पूर्णत्वाची खूण केली आहे. वय जास्त असतानाही, फक्त आणि फक्त कमालीचं कुतूहल आणि प्रबळ इच्छाशक्तीमुळं विजय पावडे यांनी ही कामगिरी केली आहे. त्यांचा हा अनुभव इतरां नानापरिंनी प्रेरणा देत आहे हे खरं.