जामिनावर सुटला असाल तर आनंद साजरा करा; मोदींचा काँग्रेसला टोला
कोणालाही उचलून थेट तुरुंगात टाकायला हे काही आणीबाणीचे राज्य नव्हे.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाच्या भाषणात काँग्रेसची चांगलीच फिरकी घेतली. आमच्या सरकारची भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई सुरुच राहील. आम्ही काही जणांना तुरुंगात टाकले नाही म्हणून आमच्यावर टीका केली जाते. मात्र, कोणालाही उचलून थेट तुरुंगात टाकायला हे काही आणीबाणीचे राज्य नव्हे. ही लोकशाही आहे आणि कोणालाही तुरुंगात टाकण्याचा निर्णय न्यायपालिकाच घेईल. आम्ही कायद्याला त्यांचे काम करून देत आहोत. त्यामुळे कोणाला जामीन मिळाला असेल तर त्यांनी आनंद साजरा करावा. आमचे सरकार सूडबुद्धीने कारवाई करणार नाही, असे मोदींनी म्हटले.
काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधिररंजन चौधरी यांनी सोमवारीच मोदी सरकारला लक्ष्य करताना म्हटले होते की, गेल्या पाच वर्षांमध्ये तुम्ही टुजी आणि कोळसा घोटाळ्यातील आरोपींना पकडू शकलात का? तुम्ही सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना तुरुंगात टाकले का? या सगळ्यांना चोर म्हणत तुम्ही सत्तेवर आलात. मात्र, यानंतर तुम्ही कोणतीही कारवाई केली नाहीत. मग तुम्हाला संसदेत बसण्याचा हक्क आहे का, असा सवाल चौधरी यांनी लोकसभेत उपस्थित असणाऱ्या नरेंद्र मोदींना विचारला होता.
दरम्यान, आजच्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीच्या मुद्द्यावरूनही काँग्रेसला लक्ष्य केले. देशाचा विकास मोजक्याच व्यक्तींमुळे झाला असे काँग्रेसकडून भासवले जाते. त्यामुळे ते विकासाचे श्रेय देताना मोजक्याच व्यक्तींचा उल्लेख करतात आणि इतरांकडे दुर्लक्ष करतात. अनेकदा चर्चांमध्ये देशाचा विकास कोणी केला? असा प्रतिसवाल केला जातो. मात्र, आज २५ जून आहे. यादिवशी आणीबाणी कोणी लादली? आम्ही ते दिवस कधीही विसरु शकत नाही, असे मोदींनी म्हटले.
तसेच काँग्रेसने समान नागरी कायदा आणि शहाबानो खटल्यासारख्या सुवर्णसंधी गमावल्या. शहाबानो खटला हा महिलांच्या सशक्तीकरणासाठी चांगली संधी होती. मात्र, काँग्रेसने ती वाया घालवली. आता आम्ही पुन्हा एकदा तिहेरी तलाकचे विधेयक घेऊन आला आहोत. काँग्रेसने त्याचा धर्माशी संबंध जोडू नये, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले.