नोट पाण्यात भिजली आणि खराब झाली तर बँक ती बदलून देईल का? पाहा RBIने काय सांगितले...
अनेकवेळा काहींचे पैसे शर्ट किंवा पॅन्टच्या खिशात राहतात. मात्र, कपडे धुताना नोटा भिजतात. किंवा काहीवेळा कपडे वॉशिंग मशीनमध्ये टाकून धुतले गेल्यानंतर काही नोटांचा रंग निघून जातो. याबाबतची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई : अनेकवेळा काहींचे पैसे शर्ट किंवा पॅन्टच्या खिशात राहतात. मात्र, कपडे धुताना नोटा भिजतात. किंवा काहीवेळा कपडे वॉशिंग मशीनमध्ये टाकून धुतले गेल्यानंतर काही नोटांचा रंग निघून जातो. या नोटा बदलण्यासाठी ती व्यक्ती बँकेत गेली असता बँकेने त्या नोटा बदलण्यास नकार दिला, याबाबतची एक पोस्ट सोशल मीडियावर दोन दिवसांपासून व्हायरल होत आहे. मात्र, बँक असे करु शकत नाही. आरबीआयच्या नियमांनुसार तुम्ही कोणती नोट बँकेत जमा करू शकता आणि त्याबदल्यात दुसरी नोट घेऊ शकता.
फाटलेल्या नोटा सहज बदलता येतात
आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, तुमच्याकडे कोणतीही फाटलेली नोट असल्यास, तुम्ही ती बँक किंवा आरबीआय कार्यालयातून सहजपणे बदलून घेऊ शकता. तथापि, नोट किती फाटली आहे यावर अवलंबून असते. नोट बदलण्यासाठी बँक तुमच्याकडून कोणतेही शुल्क आकारणार नाही. पण तुमच्याकडे ओली नोट असेल तर तीही बदलली जाऊ शकते.
फाटलेल्या नोटा बदलून घेण्याचा नियम लोकांना माहीत आहे, पण नोटेचा रंग गेल्याबद्दल लोकांमध्ये फारशी माहिती नाही. कारण अशी प्रकरणे क्वचितच पाहायला मिळतात. पण कधी कधी पाऊस किंवा इतर कारणांमुळे नोटा भिजून त्यांचा रंग निघून जातो. दुकानदारही रंग गेलेल्या नोटा स्वीकारण्यास नकार देतात. अशा परिस्थितीत तुम्ही बँकेत जाऊनही या नोटा बदलून घेऊ शकता.
नोटा बदलण्याबाबत आरबीआयने दिले हे उत्तर
आरबीआयने एका आरटीआयला उत्तर देताना सांगितले होते की, अशा नोटाही खराब नोटांच्या श्रेणीत ठेवल्या जातात आणि सर्व बँका अशा नोटा बदलून घेतात. तुमच्याकडेही रंग गेलेल्या नोटा असतील तर तुम्ही बँकेत जाऊन त्या सहज बदलून घेऊ शकता.
या आधारे नोटेची किंमत ठरवली जाईल
नोट किती खराब झाली आहे आणि ती किती फाटली आहे, त्यानुसार तुम्हाला पैसे परत दिले जातात. समजा 2000 रुपयांची नोट आहे आणि ती 88 चौरस सेंटीमीटर आहे, तर तुम्हाला त्यावर पूर्ण पैसे मिळतील. पण जर नोट 44 स्क्वेअर सेंटीमीटर असेल तर तिचे मूल्य फक्त अर्धेच मिळेल. त्याचप्रमाणे तुम्ही 200 रुपयांच्या फाटलेल्या नोटेत 78 चौरस सेंटीमीटर दिल्यास तुम्हाला पूर्ण पैसे मिळतील. त्याचवेळी, 39 चौरस सेंटीमीटरवर निम्मे पैसे मिळतील.