इफ्कोचा नॅनो फर्टिलायझर कृषी जगामध्ये क्रांती आणेल : अवस्थी
इफ्कोचा नॅनो फर्टिलायझर कृषी जगामध्ये क्रांती आणेल. शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाच्या दृष्टीने हे एक क्रांतीकारी पाऊल असेल.
प्रयागराज : इफ्कोचा नॅनो फर्टिलायझर कृषी जगामध्ये क्रांती आणेल. शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाच्या दृष्टीने हे एक क्रांतीकारी पाऊल असेल. यामुळे मातीचे असंतुलन कमी होईल. दरम्यान, याच्या पेटंटसाठी अर्ज करण्यात आला आहे. पुढील दोन वर्षांत याचे पेटंट मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती इफ्कोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. यू. एस. अवस्थी यांनी दिली. दोन ग्रॅम नॅनो फर्टिलायझर १०० किलोग्रॅम युरिया खताबरोबर काम करेल, असे ते म्हणालेत.
हा एक पथदर्शक प्रकल्प आहे. प्रयोगासाठी एका जागेवर १०० टक्के नॅनो फर्टिलाझरचा उपयोग केला गेला. तर दुसऱ्या ठिकाणी २५ टक्के यूरिया टाकले आणि ७५ टक्के नॅनो फर्टिलायझर टाकले आणि दोन्ही जागांमध्ये उत्पादनात घट झालेली नाही. अवस्थी म्हणाले की, इफ्कोने गुजरातच्या कलोल कारखाण्यामध्ये नॅनो फर्टिलायझरसाठी प्रयोगशाळा तयार केली आहे.
इफ्कोच्या माध्यमातून देशात नीमची (कडूनिंब) ४५ लाख वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. भारतीय वन संशोधन संस्थेत याबाबत अभ्यास करण्यात येत आहे. कडुनिंबाची झाडे पाच वर्षांत लावली जातील. आता नीमचे झाड तयार करण्यासाठी १० वर्षे लागतात, असे ते म्हणालेत.