मोबाईलवर मिळेल हवामानाचा अलर्ट; सरकारकडून MAUSAM APP लॉन्च
तीन संस्थांनी एकत्र मिळून हे ऍप तयार केलं आहे.
नवी दिल्ली : आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन (Harsh Vardhan) यांनी हवामानाच्या पूर्वानुमानासाठी (weather forecast) मोबाइल ऍप (Mobile App) लॉन्च केलं आहे. या ऍपच्या माध्यमातून शहराचा हवामान अंदाज आणि इतरही माहिती मिळू शकेल.
इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इंस्टिट्यूट फॉर सेमी-एरिड ट्रॉपिक्स (ICRIST), भारतीय ट्रॉपिकल हवामान विज्ञान संस्था (IITM), पुणे आणि भारतीय हवामान विभागाने (IMD) एकत्र मिळून हे ऍप तयार केलं आहे.
आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी हे हवामान ऍप लॉ्च केलं. यंत्रसामग्रीची साधनं आणि संगणकाशी संबंधित संसाधने बदलण्यासाठी प्रचंड गुंतवणूकीची आवश्यकता आहे. सध्याच्या कमीतकमी बजेटमध्ये दुप्पट गुंतवणूक करणं आवश्यक आहे, असं यावेळी डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं.
हवामान ऍप गूगल प्ले स्टोर आणि ऍपलसाठीच्या ऍप स्टोरवरही उपलब्ध आहे. या ऍपद्वारे जवळपास 200 शहरांचं तापमान, आर्द्रता पातळी, हवेची गती आणि दिशानिर्देशासह हवामानाशी संबंधित सर्व माहिती मिळणार आहे. यावर दिवसातून आठ वेळा सूचना पाठवल्या जातील.
हवामान ऍप देशातील जवळपास 450 शहरांसाठी पुढील सात दिवस हवामानाचा अंदाज वर्तवेल. गेल्या 24 तासातील माहितीही यावर दिसेल. यामध्ये सर्व जिल्ह्यांसाठी लाल, पिवळा, नारंगी अशा रंगांनुसार अलर्ट सिस्टमही देण्यात आला आहे. याद्वारे लोकांना हवामानाबाबत अलर्ट केलं जाऊ शकेल.