Mandous Cyclone Updates : गेल्या काही दिवसांपासून भारतात सुरु असणाऱ्या थंडीच्या लाटेचा प्रकोप उत्तर भारत वगळता उर्वरित भागांमध्ये ओसरताना दिसत आहे. मुंबई आणि शेजारील भागामध्ये धुरक्यांचं प्रमाण वाढत असल्यामुळं अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. समुद्री वाऱ्यांचा वेग मंदावल्यामुळं धुरक्याचं प्रमाण वाढलं असल्याचं सांगितलं जात असतानाच तिथे बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी चक्रीवादळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. 'मंदोस' असं या चक्रिवादळाचं नाव असून, त्याचे थेट परिणाम तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये दिसून येणार आहेत. (IMD rain predictions mandous Cyclone storm high alert in tamilnadu read details latest Marathi news )


हेसुद्धा वाचा : गुजरातमध्ये पुन्हा भाजप सत्तेवर? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वादळामुळे या भागांमध्ये मुसळधार ते मध्यम स्वरुपातील पर्जन्यमानाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्यानं सतर्कतेचा इशारा म्हणून या भागांमध्ये ऑरेंज अर्लट जारी केला आहे. वातावरणात असणाऱ्या या संपूर्ण परिस्थितीला पाहता त्याचे परिणाम देशभरात दिसणार असून दिवसा उकाडा वाढणार आहे. काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि पावसाच्या हलक्या सरीही बरसू शकतात असं, IMD नं सांगितलं आहे. 


चक्रीवादळ सध्या कुठवर आलंय? (mandous Cyclone live location)


आज मंदोस हे चक्रीवादळ तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशातील दक्षिण किनारपट्टीवर धडकणार आहे. परिणामी या भागांच्या किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वादळामुळं होणारे परिणाम आणि भविष्यातील कोणतंही संकट टाळण्यासाठी या भागातील शाळांनाही सुट्टी देण्यात आली आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या घडीला ताशी 39 किमी इतक्या वेगानं वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. 


महाराष्ट्रावर या वादळाचे परिणाम होणार का? (impacts of mandous Cyclone in maharashtra)


वादळाची वाटचाल आग्नेयेकडून वायव्येकडे होत असल्यामुळं त्याचे महाराष्ट्रात थेट परिणाम दिसून येणार नसले, तरीही अंशत: दिसणारे परिणाम नाकारता येत नाहीत. 9 ते 16 डिसेंबर या दरम्यानच्या कालावधीत वादळामुळं मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण असणार आहे. काही भागांमध्ये अवकाळी पावसाचीही शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या साऱ्यामध्येच राज्यातील तापमान काही अंशांनी वाढणार आहे. 



कसा असेल वादळाचा पुढील प्रवास ? 
पश्चिम वायव्येच्या दिशेनं पुढे जात असतानाच या वादळाला चक्रीवादळाचं स्वरुप प्राप्त होत आहे. आजपासून ते वेगानं पुढे जात असून, 10 डिसेंबरच्या सुमारास मंदोस आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. यावेळी ताशी 65 ते 85 किमी वेगानं वारे वाहणार असल्याचाही इशारा देण्यात आला आहे.