आधार कार्डसंबंधी महत्त्वाची बातमी...
बँक खात्याला आधार कार्डशी संलग्न केलं जावं की नाही याबद्दलचं संभ्रम खुद्द रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दूर केलाय.
मुंबई : बँक खात्याला आधार कार्डशी संलग्न केलं जावं की नाही याबद्दलचं संभ्रम खुद्द रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दूर केलाय.
रिझर्व्ह बँकेनं एक अधिसूचना जाहीर केलीय. यानुसार, बँक खात्यांना आधार कार्डशी लिंक करणं अनिवार्य आहे आणि यासाठी बँकांना आदेशांची वाट पाहू नये.
रिझर्व्ह बँकेनं बँक खात्यांना आधार कार्डशी लिंक करण्यासंबंधी कोणतेही आदेश जाहीर केलेले नाहीत, असा दावा मीडियामध्ये केला जात होता. माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या एका याचिकेवर दिलेल्या उत्तराच्या आधारे हा दावा केला जात होता.
केंद्रानं जून महिन्यात जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, आधार कार्ड बँक खात्याला लिंक करणं गरजेचं आहे. जर तुमचं कोणत्याही बँकेत खातं आहे तर ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत तुम्हाला हे खातं आपल्या आधार क्रमांकाशी संलग्न करावं लागेल... जर आधार क्रमांक संलग्न केला नाही तर तुम्हाला ट्रान्झॅक्शन करताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो... किंवा तुमचं खातंही बंद होऊ शकतं.