देशात २०१७मध्ये ३ हजार ५९७ जणांचा रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मृत्यू
२०१६ साली हीच आकडेवारी ३२९ इतकी होती.
नवी दिल्ली: देशात खड्ड्यांमुळे बळी गेलेल्यांची संख्या ही दहशतवादी, नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मारले गेलेल्यांपेक्षा जास्त असल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. देशात २०१७ मध्ये खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात ३ हजार ५९७ जणांचा मृत्यू झालाय. याच काळात देशात विविध भागात झालेले दहशतवादी हल्ले आणि नक्षलवादी हल्ल्यात ८०३ जणांचा मृत्यू झालाय. खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातात २०१६ साली २ हजार ३२४ जणांचा मृत्यू झाला.
महाराष्ट्रात रस्ते अपघातात ७२६ जणांचा मृत्यू
महाराष्ट्रात खड्ड्यांमुळे होणाऱ्या रस्ते अपघातात ७२६ जणांचा मृत्यू झालाय. २०१६ साली हीच आकडेवारी ३२९ इतकी होती. त्यामुळे खड्ड्यांमुळे होणारे अपघातमृत्यू हे दुपटीने वाढल्याचे समोर आलंय. कल्याणमध्ये खड्ड्यांमुळे ५ जणांचा बळी गेला होता. मुंबई आणि ठाण्यातही खड्ड्यांमुळे अपघात घडतायत. त्यामुळे संबधित पालिका आणि प्रशासन टीकेचं लक्ष्य ठरलंय. त्यातच ही धक्कादायक आकडेवारी समोर आलीय.
चंद्रकांत दादांकडून 'कहीं पे निगाहें कहीं पे निशाना '
दरम्यान, खड्ड्यांमुळे होणाऱ्या मृत्यूवर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली येथे अजब विधान केलंय. ज्या रस्त्याने ५ लाख लोक गेलेत यांत सगळाच दोष रस्त्याचा नाही, असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. यावेळी रस्त्यावरील खड्ड्यांचे खापर त्यांनी मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर फोडलंय.