सध्याच्या काँग्रेसमध्ये गुणवत्तेला स्थान उरलेले नाही- ज्योतिरादित्य सिंधिया
सचिन पायलट Sachin Pilot यांच्या बंडाचे पडसाद इतर राज्यांमधील तरुण काँग्रेसजनांमध्ये उमटू शकतात.
नवी दिल्ली: सद्यपरिस्थितीत काँग्रेस पक्षात गुणवत्तेला स्थान उरलेले नाही. देशातील प्रत्येक राज्यात काँग्रेसची हीच परिस्थिती असल्याची टीका भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केली. सचिन पायलट यांच्या बंडानंतर राजस्थानमध्ये निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने सिंधिया यांनी हे वक्तव्य केले. तत्पूर्वी काँग्रेसच्या मुंबईतील नेत्या प्रिया दत्त यांनीही सचिन पायलट यांचे समर्थन करत पक्षाला एकप्रकारे घरचा आहेर दिला होता. त्यामुळे आता सचिन पायलट Sachin Pilot यांच्या बंडाचे पडसाद इतर राज्यांमधील तरुण काँग्रेसजनांमध्ये उमटू शकतात. प्रिया दत्त यांच्या या एकूण ट्विटचा सूर हा ज्येष्ठांविषयी नाराजी व्यक्त करणारा आहे. त्यामुळे आता काँग्रेसमध्ये तरुण विरुद्ध ज्येष्ठ असा संघर्ष उभा राहण्याची भीती आहे.
राजस्थान आणि दिल्लीत रविवारपासून वेगवान राजकीय हालचाली सुरु आहेत. सचिन पायलट सध्या दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. पायलट आणि गेहलोत यांच्यातील वादात पश्रश्रेष्ठींनी मंगळवारी अशोक गेहलोत यांची बाजू उचलून धरली. काहीवेळापूर्वीच काँग्रेसने सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे आता सचिन पायलट यांच्या आगामी राजकीय भवितव्याविषयी तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.
महत्त्वाकांक्षा असण्यात गैर काय; प्रिया दत्त यांच्याकडून पायलटांची पाठराखण
दरम्यान, पायलट भाजपमध्ये प्रवेश करण्याची किंवा स्वतंत्र पक्ष स्थापन करतील, अशी चर्चा आहे. परंतु, भाजपकडून अजूनही सावध भूमिका घेतली जात आहे. राजस्थानातील जनता या सरकारवर प्रक्षुब्ध झाली आहे. त्यामुळे आता जगातील कोणतीही ताकद काँग्रेस सरकारला वाचवू शकत नाही. हे सरकार सत्तेतून जाणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता असेल. त्यादृष्टीने आम्ही सध्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. आगामी काळात परिस्थिती पाहून आम्ही रणनिती निश्चित करू, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतिश पुनिया यांनी दिली.