मुंबई : देशातील अवकाश संशोधन आणि विकास क्षेत्रात क्रांतिकारक निर्णय घेण्यात आला आहे. अवकाश संशोधन आणि विकास क्षेत्र हे खासगी कंपन्यांना खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत इस्रोचे अध्यक्ष डॉ. के सिवन यांनी घोषणा केली आहे. त्यामुळे खासगी कंपनीला इस्रोच्या पायाभूत सुविधा मर्यादित प्रमाणात वापरण्याची मुभा मिळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इस्रोने निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार देशातील खासगी कंपनीही उपग्रह निर्मिती, प्रक्षेपक ( रॉकेट ) निर्मिती करु शकणार आहे. उपग्रहांचे प्रक्षेपण करु शकणार आहे. यासाठी खासगी कंपनीला इस्रोच्या पायाभूत सुविधा मर्यादित प्रमाणात वापरण्याची मुभा देण्यात येणार आहे.



दरम्यान, अवकाश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात खासगी कंपन्यांच्या सहभागाची व्याप्ती वाढविण्यासाठी कायदा करण्याचे सरकारचे धोरण होते आहे. अवकाश तंत्रज्ञानात भारताने चांगली भरीव कामगिरी केली असून, मर्यादित साधनांसह चांद्रयान आणि मंगळयानापर्यंत झेप घेतली आहे. उपग्रह बांधणीच्या तंत्रज्ञानापासून त्याच्या उड्डाणापर्यंत, तसेच एकाचवेळी अनेक उपग्रह प्रक्षेपित करण्यापासून चांद्रभूमीवर कुपी उतरविण्यापर्यंतचे विविध प्रकल्प भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) यशस्वी करून या क्षेत्रातील आपल्या क्षमतेचे दर्शन जगाला घडविले आहे. 



देशाच्या अवकाश कार्यक्रमाची जबाबदारी सुरुवातीपासूनच इस्रोच्या खांद्यावर असून, ती सक्षमपणे पेललीही जात आहे. मात्र, अलीकडच्या काळात अवकाश सेवांची व्याप्ती वाढली आहे. संदेश दळणवळणापासून हवामान अंदाजापर्यंत आणि उपग्रहांद्वारे नेमके छायाचित्र टिपण्यापासून नकाशे तयार करण्यापर्यंतच्या अनेक सेवांना देश आणि विदेशातून मागणी वाढत आहे. त्यासाठी त्या प्रमाणात उपग्रह सोडावे लागणार आहेत. 


 अवकाश कार्यक्रम जारी ठेऊन सेवा पुरविण्याचा प्रयत्न इस्रोकडून होत असला, तरी तिच्यावरील ताण वाढतो आहे. शिवाय यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकही करावी लागणार आहे. या दोन्ही कारणांमुळे व्यावसायिक अवकाश सेवा खासगी क्षेत्रासाठी खुले करण्याचा विचार व्यक्त केला जात होता.