Ernakulam Blasts: केरळमधील (Kerala) एर्नाकुलम येथील योहावा ख्रिश्चन कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर (Blasts) केंद्र सरकारने या घटनेची तात्काळ दखल घेतली आणि एनएसजी (NSG), एनआयएचे पथक केरळला पाठवलं आहे. प्रार्थनेदरम्यान झालेल्या या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून 36 लोक जबर जखमी झाले आहेत. बॉम्बस्फोटाची माहिती मिळताच एनआयए आणि केरळ पोलिसांचे (Kerala Police) पथक घटनास्थळी पोहोचलं होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिला स्फोट सकाळी 9.30 च्या सुमारास झाला. त्यानंतर एकापाठोपाठ तीन स्फोटांनी संपूर्ण कन्व्हेन्शन सेंटर हादरले. प्राथमिक तपासात स्फोटांसाठी 'इन्सेंडरी डिव्हाईस' आणि 'इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस' म्हणजेच आईडीचा (IED) वापर करण्यात आला होता. हे स्फोटके टिफिन बॉक्समध्ये लपवून ठेवली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, एर्नाकुलममधील कलामासेरी येथे असलेल्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये प्रार्थना सुरू होती. या तीन दिवसीय परिषदेत शेकडो लोक उपस्थित होते. त्यानंतर एका पाठोपाठ तीन स्फोट झाले. या स्फोटात अनेकजण जखमी झाले. तर एका महिलेचा मृत्यू झाला. सर्व जखमींवर एर्नाकुलम मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. केरळ पोलीस आणि एनआयए पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दिल्लीहून केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि गृहमंत्री अमित शाह संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.


एक दिवस आधी केरळमध्ये हमासच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आली होती. त्यामुळे केंद्र सरकारने या स्फोटाला गांभीर्याने घेतलं आहे. जमात-ए-इस्लामीच्या सहयोगी संघटनेने मलप्पुरममध्ये हमासच्या समर्थनार्थ रॅली काढली होती. एक दिवस आधी कॅथोलिक चर्चने हमासचा निषेध केला होता. केरळमधील रॅलीत हमासच्या माजी प्रमुखाचे ज्या पद्धतीने भाषण केले जाते आणि त्यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या जातात, ते योग्य नाही. दहशतवाद्यांचा गौरव करू नये, असे चर्चच्या वतीने सांगण्यात आले होते. त्यानंतर आता चर्चवरच प्रार्थना सभेदरम्यान हल्ला झाला आहे. 


आयईडी म्हणजे आहे?


आयईडी म्हणजेच सुधारित स्फोटक उपकरण हे बॉम्ब आहेत जे लष्करी बॉम्बपेक्षा वेगळे आहेत. हे मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यासाठी वापरले जातात. आयडी स्फोटादरम्यान, घटनास्थळी आग लागते कारण त्यात प्राणघातक आणि आग लावणारी रसायने वापरली जातात. जेव्हा या बॉम्बवर दबाव टाकला जातो तेव्हा जोरदार आग आणि धुराचा स्फोट होतो. याच्या स्फोटासाठी दहशतवादी आणि नक्षलवादी रिमोट कंट्रोल, इन्फ्रारेड किंवा मॅग्नेटिक ट्रिगर्स यांसारख्या पद्धती वापरतात. भारतात नक्षलवाद्यांकडून आयईडीद्वारे स्फोट घडवून आणण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.


दरम्यान, केरळमधील एर्नाकुलम येथील कलामासेरी येथील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या तीन स्फोटानंतर एका व्यक्तीने आत्मसमर्पण केल्याची बातमी समोर आली आहे. त्रिशूर जिल्ह्यातील कोडकारा पोलीस ठाण्यामध्ये एका व्यक्तीने आत्मसर्मण केल्याचे सांगितले जात आहे. त्याने कन्व्हेन्शन सेंटरमध्ये बॉम्ब लावल्याचा दावा केला आहे. आरोपीची कसून चौकशी करण्यात येत आहे.