नवी दिल्ली: राम मंदिराच्या निर्माणासाठी काँग्रेस प्रयत्न करणार असेल तर आम्ही त्यांना पाठिंबा देण्याचा विचार करू, असे वक्तव्य विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी केले आहे. ते शनिवारी कुंभमेळ्यात आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांना राम मंदिरासाठी विहिंप अन्य कोणत्या पर्यायांचा विचार करत आहे, असा प्रश्न विचारला. त्यांनी म्हटले की, काँग्रेसने आमच्यासाठी त्यांचे सर्व दरवाजे बंद केले आहेत. मात्र, राम मंदिराचा मुद्दा जाहीरनाम्यात समाविष्ट करून ते चर्चेचे दरवाजे उघडत असतील तर आम्ही त्यावर विचार करायला तयार असल्याचे आलोक कुमार यांनी सांगितले. विहिंपची ही भूमिका भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यायालयीन सुनावणी पूर्ण झाल्यानंतरच केंद्र सरकार राम मंदिराबाबत पाऊल उचलेल, असे सांगितले होते. तेव्हापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इतर हिंदू संघटनांमध्ये काहीशी नाराजीची भावना आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आलोक कुमार यांनी ही नाराजी व्यक्त करताना म्हटले की, हिंदुत्त्व आणि राष्ट्रीयतेच्यादृष्टीने भाजप इतरांच्या तुलनेत अधिक कटिबद्ध आहे. राम मंदिरासाठी मोदी सरकार कायदा करेल असे आम्हाला वाटत होते. त्यासाठी आम्ही आग्रह देखील केला होता. पण आता वाटत नाही की, हे सरकार कायदा करु शकले. कमीत कमी या कार्यकाळात तर कायदा शक्य नाही. यासाठी आम्ही आता दुसऱ्या पर्यायाचा विचार करत आहोत. यासाठी साधू संतांसोबत चर्चा करणार असल्याचे कुमार यांनी सांगितले. येत्या १ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या धर्म संसदेत संत पुढची दिशा निश्चित करतील, असे कुमार यांनी सांगितले होते. दरम्यान, या सगळ्या वादानंतर आलोक कुमार यांनी आपल्या विधानावरून घुमजावही केले. आमचा हा प्रस्ताव फक्त काँग्रेसच नव्हे तर इतर पक्षांसाठी असल्याचेही आलोक कुमार यांनी सांगितले. 


'राम मंदिर खटला प्रलंबित असला तरी सरकार कायदा करू शकतं, पण...'


तत्पूर्वी राम मंदिराच्या मुद्द्यावरून सहकार्यवाह भैयाजी जोशी यांनी कुंभमेळ्यातील कार्यक्रमात थेट मोदी सरकारवर निशाणा साधला होता. अयोध्येमध्ये २०२५ साली जेव्हा राम मंदिराचे निर्माण होण्यास सुरूवात होईल, तेव्हा भारत वेगाने विकास करायला लागेल अशी बोचरी टीका त्यांनी केली होती.


...तर लोक स्वत: राम मंदिर बांधायला सुरुवात करतील- रामदेव बाबा