लालूप्रसाद यादव कुटुंबियांची संपत्ती आयकर विभागाकडून जप्त
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना आयकर विभागाने जोरदार धक्का दिलाय.
पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना आयकर विभागाने जोरदार धक्का दिलाय. लालू कुटुंबियांच्या १० बेहिशोबी संपत्ती जप्त करण्यात आल्यात आहेत. लालूंची पत्नी राबडीदेवी आणि त्यांच्या मुला-मुलींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मंगळवारी आयकर विभागाने लालू प्रसाद यादव यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांची बेनामी मालमत्ता जप्त केली आहे. लालूप्रसाद यादव यांची मुलगी आणि राज्यसभा सदस्य मीसा भारती, तिचे पती शैलेश कुमार, तसेच लालूप्रसाद यादव यांच्या इतर दोन मुली रागिणी आणि चंदा, तसेच मुलगा तेजस्वी यादव यांच्या नावे असलेले १२ प्लॉट जप्त केलेत.
लालू कुटुंबियांच्या मालमत्तेची किंमत १७५ कोटींच्या घरात आहे. तर यांचे खरेदी मूल्य फक्त ९.३२ कोटी दाखवण्यात आले आहे. आयकर विभागाने याआधीही लालूप्रसाद यादव यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित असलेल्या मालमत्तेवर छापे मारले होते. हे सगळे छापे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप लालूप्रसाद यादव यांनी केला होता.
मे महिन्यापासूनच आयकर विभागाने या कारवाईची तयारी सुरु केली होती. तसेच दोनवेळा मीसा भारती आणि तिचे पती शैलेश कुमार यांना मालमत्तेसंदर्भात स्पष्टीकरण देण्यासही सांगितले होते. मात्र या दोघांनीही हा आदेश धुडकावला होता आणि चौकशीसाठीही दाद दिली नव्हती.
मीसा भारती यांना आयकर विभागाने दोन्हीवेळा प्रत्येकी १० हजारांचा दंडही ठोठावण्यात आला होता. आता लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या परिवाराशी संबंधित १२ मालमत्तांवर आयकर विभागाने जप्ती आणली आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने तेजस्वी यादव यांच्या पेट्रोल पंपाचा परवानाही रद्द केला होता.