आयकर विभागाने 1833 कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता केली जप्त
आयकर विभागाने आतापर्यंत केलेल्या कारवाईत 1833 कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता जप्त केली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (सीबीडीटी) ने याबाबत माहिती दिली आहे.
नवी दिल्ली : आयकर विभागाने आतापर्यंत केलेल्या कारवाईत 1833 कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता जप्त केली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (सीबीडीटी) ने याबाबत माहिती दिली आहे.
सीबीडीटीचे अध्यक्ष सुशील चंद्र यांनी माहिती दिली की, 'आयकर विभाग बेनामी मालमत्तेविरुद्ध कठोर कारवाई करत राहील आणि हे काम थांबणार नाही. मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो की ही चौकशी कधीच थांबणार नाही. आम्ही मिळणारी प्रत्येक माहिती आणि डेटा एकत्रित करीत आहोत. अशा प्रकारच्या मालमत्तेची चौकशी करुन ती जप्त केली जाईल.'
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार, ऑक्टोबर पर्यंत उपलब्ध अधिकृत आकडेवारीनुसार, 1833 कोटी रुपयांची 541 मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. त्यासाठी 517 हून अधिक नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. अहमदाबादमध्ये सर्वाधिक 136 प्रकरणे समोर आलीत. यानंतर, भोपाळमध्ये 93, कर्नाटक आणि गोवामध्ये 76, चेन्नईतील 72, जयपूरमधील 62, मुंबईतील 61 आणि दिल्लीतील 55 प्रकरणे समोर आली आहेत.