बिहार : उपमुख्यमंत्री मोदी यांच्या बहिणीच्या घरावर इन्कम टॅक्सचा छापा
भाजपचे नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांच्या बहिणीच्या घरी इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा मारला आहे.
पाटणा : भाजपचे नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांच्या बहिणीच्या घरी इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा मारला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या छापेमारेवेळी आयकर विभागासोबत बिहार पोलीसही उपस्थित होते.
बिहारमध्ये आयकर विभागाच्या कारवाईने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. भागलपूर येथे झालेल्या सृजन घोटाळ्या प्रकरणी गुरुवारी आयकर विभागाने उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांची बहीण रेखा मोदी यांच्या कार्यालयावर हे छापे मारण्यात आले आहेत. दरम्यान, सृजन घोटाळ्यावरून गेल्या काही महिन्यांपासून बिहारच्या राजकारणात रणकंदन सुरु आहे. दरम्यान, सुशील मोदी यांनी म्हटले होते, माझ्या कुटुंबीयांचा या घोटाळ्याशी संबंध नाही. तसेच सुशील मोदी यांनी म्हटले होते, रेखा मोदी यांचा काहीही संबंध नाही. रेखा मोदी ही त्यांची सख्खी बहीण नाही.
दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री आणि लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांनी सातत्याने सुशील कुमार मोदी यांचा या घोटाळ्यात हात असल्याचा आरोप केला होता. याच संबंधी जूनमध्ये त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन काही कागदपत्रे सार्वजनिक केली होती. यात त्यांनी सृजन घोटाळ्यातील काही बँक अकाऊंटचे डिटेल्स दिले होते. सृजन घोटाळ्यामध्ये सुशील कुमार मोदी यांच्या काही नातेवाईकांचाही सहभाग असल्याचा आरोप तेजस्वी यांनी केला होता.
तेजस्वी यादव यादव यांचा निशाणा
तेजस्वी यादव यांच्यासह माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांनी या प्रकरणी निष्पक्ष तपास करण्याची मागणी केलेय. तसेच मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी राजीनामा द्यावा, अशीही मागणी राबडीदेवी यांनी केली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याशिवाय या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊ शकत नाही, असे राबडी देवी म्हणाल्या.
काय आहे हा घोटाळा?
सृजन घोटाळा हा बिहारच्या भागलपूरमध्ये उघड झालाय. भागलपूर जिल्ह्यात महिलांना रोजगार देण्यासाठी सामाजिक संस्था सुरु केली. १० कोटीचे सरकारी चेक बाउंस झाल्यानंतर हा घोटाळा पुढे आला. 'सृजन महिला आयोग' नावाच्या संस्थेने बँक आणि ट्रेजरी अधिकारी (कोषागार अधिकारी) यांच्यासोबत मिळून ७५० कोटींचा घोटाळा केला. बँकेचे अधिकारी अतिशय गुप्तपणे सरकारी फंड 'सृजन महिला आयोग' नावाच्या संस्थेच्या खात्यामध्ये पैसे टाकले जात होते. या संस्थेने हे पैसे रिअर इस्टेटच्या धंद्यामध्ये गुंतवले होते. या घोटाळ्याची चौकशी सुरु आहे.