मुंबई : जम्मू- काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेलं अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्यानंतर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने तेथेही ध्वजारोहण करण्यात आलं. श्रीनगर येथे असणाऱ्या शेर-ए-काश्मीर स्टेडियममध्ये या खास दिवसाचं औचित्य साधत एका सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यावेळी ध्वजारोहणानंतर राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी उपस्थितांना संबोधित केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या ७० वर्षांमध्ये राज्यातील जनता विकास, शांतता आणि समृद्धीच्या मुख्य प्रवाहापासून दूरावलेली असं सूचक विधान केलं. काश्मीर खोऱ्यातील जनतेला वायफळ मुद्द्याच्या दिशेने जाणिवपूर्वक वळवण्यात आलं, ही बाब अधोरेखित करत त्यांच्या मुलभूत गरजांकडेही दुर्लक्ष करण्यात आलं हे स्पष्ट केलं.


सध्याच्या घडीला जम्मू- काश्मीर येथील एकंदर वातावरण पाहता, तेथे सुरु असणाऱ्या घडामोडी आणि काही महतत्वाचे बदल येत्या काळात या भागांचा आर्थिकदृष्ट्या विकास करतील असा आशावाद त्यांनी यावेळी मांडला.


जम्मू- काश्मीर येथील जनतेला आश्वस्त करत त्यांनी काही गोष्टींची हमीसुद्धा दिली. 'येथील जनतेला मी सांगू इच्छितो की तुमचं अस्तित्व कायम आहे. त्याच्याशी कोणतीही हेळसांड करण्यात आलेली नाही. त्यामुळे यावियी त्यांना चिंता करण्याची गरज नाही', असं ते म्हणाले. 




काही दिवसांपूर्वीच मोदी सरकारकडून जम्मू काश्मीरमध्ये लागू असणारं अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यानंतर या भागात काहीसं ताणावाचं वातावरणही पाहायला मिळालं. पण, सध्याच्या घडीला हे वातावरण पूर्वपदावर येत असून, स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने जनतेमध्येही बराच उत्साह पाहायला मिळाला. एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांमधून याचाच प्रत्ययही आला.