नवी दिल्ली : तामिळनाडू येथील विष्णुमंदिरातून १९७८ मध्ये चोरीला गेलेल्या विजयनगर कालखंडातील राम, सीता आणि लक्ष्मणाच्या अतिशय मौल्यवान आणि दुर्मिळ अशा तीन मूर्ती ब्रिटीश पोलिसांकडून लंडनमध्ये असणाऱ्या भारतीय वाणिज्य दूतावासाकडे सोपवण्यात आल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 'हिंदुस्तान टाईम्स'च्या वृत्तानुसार, या प्रसंगी लंडनमध्ये भारतीय उच्चायोग भवनमधील इंडिया हाऊसमध्ये एका औपचारिक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये मेट्रोपोलिटल पोलीस दलातील अधिकारी, इंडिया हाऊसमधील कर्मचारी आणि केंद्रीय सांस्कृतिक- पर्यटन मंत्री प्रल्हाद सिंह पटेल हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते. 


मूर्ती सोपवल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यामध्ये पुजाऱ्यांकडून मूर्तींवर मंत्रोच्चारांसहित पूजा-अर्चा करण्यात आली. भारताकडे या मूर्ती परत येणं म्हणजे सांस्कृतिक वस्तूंची चोरी आणि तस्करी करण्यात आलेल्या कलाकृतींना पुन्हा मायदेशी आणण्यासाठीच्या भारत सरकारच्या प्रयत्नांना आलेलं यश आहे. 



भारताकडे सोपवण्यात आलेल्या या मूर्ती राम, लक्ष्मण आणि सीतेच्या आहेत. विजयनगर कालखंडातील त्यांची घडण असल्याची माहिती समोर येत आहे. इंडिया प्राईड प्रोजेक्टच्या एस. विजय कुमार यांच्या माहितीनुसार या मूर्तींबाबतची माहिती मागील वर्षी मिळाली होती, जेव्हा एका स्वयंसेवकानं काही छायाचित्र पाठवली होती. ज्यानंतर तमिळनाडू सरकारमधील काही अधिकाऱ्यांच्या मदतीनं लंडनमधील भारतीय दूतावास आणि एएसआय यांनी या मूर्तींची ओळख पटवून त्याबाबतची खात्री केली.