ATM, रेल्वेसह `या` सात गोष्टींचे नियम बदलले, खिशावर पडणार ताण
आता १ मे २०२० पासून काही नियम बदलले आहेत. त्यामुळे सामान्यांच्या खिशावर अधिकचा ताण पडणार आहे.
मुंबई : देशात सध्या कोरोनाचे संकट असल्याने लॉकडाऊन आहे. त्यामुळे काही अपवाद वगळता सगळेच ठप्प आहे. त्यात आता १ मे २०२० पासून काही नियम बदलले आहेत. त्यामुळे सामान्यांच्या खिशावर अधिकचा ताण पडणार आहे. एटीएम, रेल्वे, बँक व्याज दर आदींच्या नियमात बदल झाला आहे. त्यामुळे आर्थिक गणित कसे जमवायचे हा प्रश्न अधिक तीव्र होणार आहे. असे असले तरी काही नियमांच्यामाध्यमातून फायदा होणार आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करणे नुकसानीचे ठरु शकते.
१. रेल्वेचा नियम -
रेल्वे प्रवासासाठी एक महत्वाचा नियम असणार आहे. रेल्वेसेवेसाठी नव्या नियमानुसार आता प्रवासी चार्टच्या आधी चार तासांपूर्वी बोर्डिंग स्टेशन बदल शकाल. आधी ही मर्यादा २४ तासांची होती. परंतु प्रवाशांनी बोर्डिंग स्टेशनमध्ये बदल केल्यानंतरही प्रवास न केल्यास परतावा (रिफंड) मिळणार नाही.
२. पेन्शन -
ईपीएफओ ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. सरकारने नुकतीच निवृत्तीच्या १५ वर्षानंतर पेन्शन रक्कम देण्याचा नियम सुरु केला आहे. त्यामुळे अशा कर्मचारी वर्गाला मे महिन्यापासून संपूर्ण पेन्शन मिळणार आहे. याचा देशातील ६.५ लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.
३. बचत खाते -
एसबीआयने १ मे २०२० पासून बचत खात्यांवरील व्याज दर कमी केले आहेत. एक लाखांपर्यंत जमा रक्कमेवर ३.५ टक्के आणि एक लाखापेक्षा जास्त रकमेवर २.७५ टक्के व्याज मिळणार आहे. आधी ते ३.२५ टक्के होते. त्यामुळे बचतीवर आता कमी व्याज मिळणार आहे.
४. विमानसेवा -
विमान प्रवास करताना काही अडचण आली आणि प्रवास रद्द करावा लागला तर तुम्हाला तिकीट विना शुल्क रद्द करता येणार आहे. मात्र, त्यासाठी कालावधी हा २४ तासांचा आहे. यावेळेनंतर त्याचा लाभ मिळणार नाही. सरकारी विमान कंपनी एअर इंडियाने ही सुविधा आपल्या प्रवाशांसाठी सुरु केली आहे.
५ . एटीएम सेवा -
एटीएमच्या माध्यमातून संसर्गजन्य रोग पसरु शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. आता कोरोनामुळे देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे एटीएमची साफसफाई करण्यात येणार आहे. आता प्रत्येक व्यक्तीच्या वापरानंतर एटीएम स्वच्छ केले जाणार आहे. ही व्यवस्ता गाझियाबाद आणि चेन्नईमध्ये सुरु करण्यात आली आहे.
६. गॅस सिलिंडर -
घरगुत वापराच्या सिलिंडरच्या किमतीत घट झाली आहे. १४.२ किलो आणि १९ किलो वजनाच्या विना अनुदानिक गॅस सिलिंडरच्या किमती कमी झाल्या आहेत. १४.२ किलो वजनाचा सिलिंडर १६२ रुपयांनी तर १९ किलो वजनाचा सिलिंडर २५६ रुपयांनी स्वस्त झाला आहे. या किमती राज्यानुसार बदलू शकतात.
७. पीएनबी डिजिटल वॉलेट -
पंजाब नॅशनल बँकेने १ मेपासून आपले डिजिटल वॉलेट बंद केले आहे. ज्या ग्राहकांच्या खात्यात झीरो बॅलन्स आहे ते डिजिटल वॉलेट बंद करु शकतात. अन्यथा ग्राहकांना पैसे खर्च करावे लागतील. तसेच आयएमपीएसच्या माध्यमातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करु शकतात.