सैन्य शक्ती असतानाही; भारत-चीन सैनिक का लढतात काठ्या-दगडांनी?
गलवान खोऱ्यातून भारत आणि चीनचे सैन्य माघारी
मुंबई : लडाखच्या गलवान खोऱ्यात सोमवारी मध्यरात्री झालेल्या तुफान झटापटीनंतर भारत आणि चीन या दोन्ही देशांनी परिसरातून आपले सैन्य माघारी बोलावले आहे. भारतीय लष्कराकडून यांसदर्भात माहिती देण्यात आली.
भारत-चीन सीमेवर जवळपास ४५ वर्षांनंतर सैनिक शहीद झाले आहेत. १९७५ साली एलएसीवर चीनने हल्ला केला होता. ज्यामध्ये चार सैनिक शहीद झाले होते. त्यानंतर दोन्ही देशात अनेकदा वाद झाले पण कुणाचे सैनिक शहीद झाले नाही. गेल्या एक महिन्यांपासून लडाखमध्ये अनेकदा भारत-चीनमध्ये वाद सुरू आहे. दोन्ही देशाचे सैनिक जखमी देखील झाले. मात्र या दरम्यान एकही सैनिकाने गोळी झाडली नाही.
भारत आणि चीन या दोन्ही देशांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. कितीही मतभेद असले तरीही सीमेवर याचा परिणाम नाही झाला पाहिजे. सीमेवर असणाऱ्या सैनिकांकडे शस्त्र नसतील. रँकनुसार ज्या अधिकाऱ्यांकडे बंदूक असतील त्यांची तोंडे जमिनीकडे असतील. सैनिकांना त्याचप्रकारे प्रशिक्षण दिलं जातं.
१५ आणि १६ जूनला भारतीय आणि चिनी सैनिक एकमेकांना भिडले. यावेळी दोन्ही बाजूच्या सैनिकांनी एकमेकांवर लोखंडी रॉड आणि दगडांनी हल्ला चढवला. या तुंबळ हाणामारीत दोन्ही बाजूचे अनेक जवान गंभीर जखमी झाले. आज दुपारीच भारताच्या एका कर्नल दर्जाच्या अधिकाऱ्यासह दोन जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, काहीवेळापूर्वीच उपचारादरम्यान आणखी १७ भारतीय जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे शहीदांचा आकडा २० वर पोहोचला आहे.