नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वीच लडाख येथे असणाऱ्या #GalwanValley गलवान खोऱ्याच्या भागामध्ये indiavschina भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांच्या सैन्यांमध्ये हिंसक झडप झाली. ज्यामध्ये दोन्ही राष्ट्रांच्या जवानांना प्राणांना मुकावं लागलं. सीमावादाचा हा प्रश्न अगदी विकोपाला गेलेला असतानाच उच्चस्तरीय बैठकांच्या माध्यमातून परस्पर सामंजस्याने त्यावर किमान सध्यातरी चर्चेतून तोडगा काढण्यात आला. पण, तरीही चीनकडून मात्र सीमाभागात सुरु असणाऱ्या लष्करी हालचालींना मात्र अधिकच वेग आल्याचं दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांच्या माहितीनुसार चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी अर्था पीएलएकडून लष्करातील अधिकाऱ्यांना मार्शल आर्ट्सचं प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षकांची नियुक्ती केली जात आहे. आतापर्यंत जवळपास २० मार्शल आर्ट्स प्रशिक्षकांना चिनी सैनिकांच्या प्रशिक्षणासाठी तिबेटमध्ये पाठवण्यात आलं आहे. मुख्य म्हणजे गलवानची घटना घ़डण्यापूर्वीच चीनकडून सैन्यदलामध्ये प्रशिक्षण देण्यासाठी मार्शल आर्ट्स प्रशिक्षकांना पाचरण करण्यात आल्याचं कळत आहे. 


चीनकडून केली जाणारी ही तयारी आणि सीमेपलीकडे सुरु असणाऱ्या एकंदर हालचाली पाहता भारतही आता 'घातक प्रहार करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय सैन्याशी संलग्न सूत्रांच्या माहितीनुसार कर्नाटकमध्ये घातक कमांडोच्या तुकडीला खास असं ४३ दिवसांचं प्रशिक्षण देण्यात येत आहे. ज्यामध्ये अतिशय कठीण असा कसरतींचे प्रकार त्यांच्याकडून करुन घेण्यात येत आहेत. जवळपास ३५ किलोंचं वजन उचलून चाळीस किलोमीटरपर्यंत धावण्याची कवायत करुन घेत कमांडोंना शारीरिक पातळीवर अधिक बळकट करण्यावर भर दिला जात आहे. 


 


शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणासोबतच या कमांडोंना हातचलाखीनं शत्रूवर मात करण्याचंही प्रशिक्षण देण्यात येत आहे. मार्शल आर्ट्सचाही या प्रशिक्षणामध्ये समावेश आहे. यामधील काही कमांडोंची तुकडी सीमाभागात तैनातही करण्यात आली आहे. त्याशिवाय यासोबतच आणखी एक तुकडी तयार करण्यात येत असून, भारत चीनसाठी 'घातक' ठरणार हेच आता स्पष्ट होत आहे.