नवी दिल्ली : दिल्ली निर्भया प्रकरणातील दोषींना आज पहाटे ५.३० वाजता फाशी देण्यात आली. ७ वर्षानंतर निर्भयाला न्याय मिळाल्याने देशभरातून या निर्णयाचे स्वागत होत असून आनंद साजरा केला जातोय. निर्भयाच्या आईने देखील यावर समाधान व्यक्त केलंय. पहाटे चौघाही दोषींना एकावेळी फासावर लटकावण्यात आले. मुकेश, अक्षय सिंह, पवन आणि विनय यांना फाशी देण्यात आली. बलात्कारी दोषींना एकत्र फासावर लटकवण्याची देशातील ही पहिली वेळ आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी देखील एकावेळी चौघा दोषींना फाशी देण्याची घटना घडली होती. २७ नोव्हेंबर १९८३ ला जोशी-अभ्यंकर प्रकरणात एकावेळी चौघांना फाशी देण्यात आली. जोशी-अभ्यंकर प्रकरण हे दहा लोकांच्या मृत्यूशी जोडले गेले होते. हे प्रकरण इतकं गंभीर होतं की न्यायालयाने दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. या चौघांना पुण्याच्या येरवडा कारागृहामध्ये फाशी देण्यात आली होती. हत्येच्या गुन्ह्यामध्ये ही फाशी देण्यात आली होती.



बलात्कारप्रकरणात फाशी 


याआधी एकावेळी चौघांना फाशी देण्यात आली ती हत्येच्या गुन्ह्यातील होती. बलात्कार प्रकरणात एकावेळी चौघांना फाशी देण्याची ही पहिली वेळ आहे. बलात्कार प्रकरणात याआधी २००४ मध्ये फाशी देण्यात आली होती. पश्चिम बंगालच्या धनंजय चॅटर्जीला फाशीची शिक्षा सुनावली होती. कोलकाताच्या अलीपूर तुरुंगात ही फाशी देण्यात आली होती. धनंजयला सकाळी दहा वाजता फासावर लटकावण्यात आले. कोलकाता येथील जल्लाद मलिक नाटा याने हे काम केले.