नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट येथे हवाई हल्ला अर्थात एअर स्ट्राईक करत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उध्वस्त केल्याचे पुरावे अखेर भारतीय वायुदलाकडून सादर करण्यात आले आहेत. सरकारकडे वायुदलाने हे पुरावे सादर केल्याचं वृत्त मिळालं असून, या हल्ल्यात जवळपास ८० टक्के बॉम्बनी लक्ष्यभेद केल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. वायुदलाकडून पुराव्यांचा अहवात सादर करतेवेळी उपग्रहाच्या सहाय्याने टीपण्यात आलेली छायाचित्रंही सुपूर्द करण्यात आली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२६ फेब्रुवारीला भारतीय वायुदलाने पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास मिराज २०००, सुखोई आणि नेत्रा या विमानांच्या ताफ्याच्या सहाय्याने जवळपास १ हजार किलोंचे बॉम्ब वापरत पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट येथे हल्ला केला. अतिशय मोठ्या स्वरुपात करण्यात आलेल्या या हल्ल्यात जवळपास ८० टक्के बॉम्बने लक्ष्यभेद केल्याचे पुरावे सरकारकडे सोपवण्यात आले आहेत. या सर्व प्रकरणाशी संबंधित सूत्रांनी ही माहिती 'इंडिया टुडे'ला दिली. 


पाहा : बालाकोटच्या यशात 'नेत्रा'च्या कटाक्षाचं महत्त्वपूर्ण योगदान


माध्यमं आणि इतर काही वर्गांकडून या कारवाईत शत्रूवर निशाणा साधण्यात वायुदल अपयशी ठरलं होतं, या अफवांना छेद देण्यासाठी वायुदलाकडून एक डोजियर तयार करण्यात आलं. शिवाय पाकिस्ताकडूनही या हल्ल्यात उत्तर भागातील पर्वतमय, डोंगराळ भागात असणाऱ्या बालाकोट येथील पाईन वृक्ष आणि जंगलाच्या काही भूभागाचंच नुकसान झाल्याचं सांगण्यात आलं होतं. याच धर्तीवर आता हे पुरावे सादर करण्यात आले आहेत.


भारतीय वायुदलाकडून सरकारपुढे सादर करण्यात आलेल्या या डोजियरमध्ये १२ पानी अहवालात उपग्रहांच्या माध्यमातून टीपलेल्या हाय रेझोल्युशन छायाचित्रांचा आणि भारतीय हवाई हद्दीत उडणाऱ्या वायुदलाच्या इंटेलिजन्स एअरक्राफ्टच्या माध्यमातून टीपण्यात आलेल्या सिंथेटीक अपर्चर रडार छायाचित्रांचा समावेश आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 


मिराज २००० या लढाऊ विमानाच्या माध्यमातून बालाकोट येथे करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकमध्ये इस्रायली बनावटीचे स्पाईस २००० हे बॉम्ब निर्धारित लक्ष्यावर टाकण्यात आले होते. ज्यामुळे त्या परिसरातील इमारतींच्या छतांवरच थेट हल्ला करण्यात आला, परिणामी इमारतींच्या आतमध्ये मोठे स्फोट झाले. या हल्लामुळे संबंधित परिसराचं मोठ्या प्रमाणावर अंतर्गत स्वरुपात नुकसान झाल्याचंही सुत्रांनी स्पष्ट केलं. वायुदलाकडून सादर करण्यात आलेले हे पुरावे पाहता आतातरी बालाकोट हल्ल्याविषयी होणाऱ्या चर्चांना आणि त्याविषयी उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांना पूर्णविराम मिळणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.