नवी दिल्ली: कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने तत्परतेने पावले उचलली नाहीत. देशाला याची मोठी किंमत मोजावी लागेल, असे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले. त्यांनी बुधवारी ट्विट करून केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. कोरोना व्हायरसचा (COVID 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने आक्रमक पद्धतीने पावले उचलायला हवी होती. मात्र, ही तत्परता दाखवण्यात सरकार अपयशी ठरले. त्यामुळे येणाऱ्या काळात भारताला याची मोठी किंमत मोजावी लागेल, अशा इशारा राहुल गांधी यांनी दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत कोरोनाचा आणखी एक रुग्ण


गेल्या काही दिवसांपासून भारतामधील कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. आज हा आकडा १५१ वर जाऊन पोहोचला. याशिवाय, देशाबाहेर अडकून पडलेल्या भारतीय कोरोनाबाधितांची संख्या यापेक्षा मोठी असल्याचे आजच समोर आले. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशाबाहेरील २७६ भारतीय नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये इराणमधील २५५, सौदी अरेबियातील १२, इटलीतील ५ आणि हाँगकाँग, कुवेत, श्रीलंका आणि रवांडामधील प्रत्येकी एका भारतीयाचा समावेश आहे. या सर्वांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याची माहिती परराष्ट्र खात्याने दिली. 



भारत हा COVID-19 विषाणूची लागण होण्याच्या दुसऱ्या टप्प्यात आहे. त्यामुळे सध्या भारतातील कोरोनाग्रस्तांमध्ये बहुतांश जण हे परदेशातून आलेले आहेत. आगामी १५ दिवस हे कोरोनाला पायबंद घालण्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. या काळात योग्य खबरदारी न घेतल्यास भारत COVID-19 प्रादुर्भावाच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करेल. या टप्प्यात कोरोना व्हायरसचा एखाद्या साथीच्या रोगाप्रमाणे फैलाव होऊ लागेल. त्यामुळे कोरोनाला दुसऱ्या टप्प्यात रोखणे अत्यंत गरजेचे आहे.