IMD | पुढील 5 दिवस ढगाळ वातावरणासह पावसाचा इशारा, हवामान खात्याचा इशारा
थंडीचा जोर ओसरू लागला आहे. तर दुसरीकडे पावसाने लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
मुंबई : थंडीचा जोर ओसरू लागला आहे. तर दुसरीकडे पावसाने लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. उत्तर-पश्चिम भारतात 3 मार्चपर्यंत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. सोबतच डोंगराळ भागात बर्फवृष्टी होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. (india meteorological department predicts rainfall during 28 february to 3 march in punjab haryana jammu kashmir delhi and himachal pradesh state)
हवामान विभागानुसार, पश्चिम हिमालयीन भागात 28 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. याशिवाय या भागात बर्फवृष्टी होण्याचीही शक्यता आहे. तसेच 2 मार्चला उत्तर-पश्चिम भारताच्या जवळच्या मैदानी भागात पाऊस होऊ शकतो. यादरम्यान पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्लीतही पाऊस पडेल.
जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये आज दिवसभर ढगाळ वातावरण आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये 2 मार्चपर्यंत ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे पुढील 5 दिवस हवामानात कोणताही बदल होण्याचा अंदाज नाही, असं हवामान विभागानं म्हटलं आहे.
दिल्लीत गेल्या 24 तासांमध्ये 10 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सोबतच अनेक भागात गारपीटही झाली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिल्लीच्या वायु गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा झाल्याचं सांगितलं आहे.