जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील आघाडीच्या टेस्ला (Tesla) कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क (Elon Musk) यांनी अनेकवेळा भारतातील (India) प्रतिभेचे खुलेपणाने कौतुक करण्यासोबत गुंतवणुकीबाबतही अनेकवेळा भाष्य केलं आहे. भारतीय राजकारण्यांनीही सातत्याने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच टेस्लाचे सर्वेसर्वा एलन मस्क ट्विटरवर (Twitter) नेहमीच अ‍ॅक्टिव असतात. ट्विटरवर प्रश्न विचारण्यांनाही मस्क हे सातत्याने रिप्लाय देत असतात. मस्क यांनी गेल्या वर्षी पुण्यातील (Pune) एका मराठमोळ्या इंजिनियरला (Engineer) ट्विटरवरुन रिप्लाय दिला होता. त्यानंतर पुन्हा एकदा हा तरुण चर्चेत आला आहे. प्रणय पाटोळे (Pranay Patole) असं या पुण्यातील तरुणाचे नाव आहे.


कारण प्रणय पाटोळेला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीला भेटण्याची संधी मिळाली आहे. प्रणय पाटोळेने अमेरिकेत एलन मस्क यांची भेट घेतली आहे. प्रणयने या भेटीचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे.


पुण्यात राहणारा २४ वर्षीय प्रणय पाटोळे हा आयटी प्रोफेशनल आहे. एलन मस्कसोबतच्या भेटीचा फोटो पोस्ट करत म्हटले की, "टेक्सास गिगाफॅक्टरी येथे झालेली बैठक अप्रतिम होती. त्यांच्यासारखा उदात्त आणि उदार माणूस पृथ्वीवर कधीच पाहिला नाही. लाखो लोकांसाठी तुम्ही प्रेरणास्थान आहात."



दरम्यान, माध्यमांच्या वृत्तानुसार,  प्रणयने बिझनेस अॅनालिटिक्समध्ये मास्टर ऑफ सायन्स केले आहे. त्याने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्येही काम केले आहे. प्रणयने मस्क यांच्यासोबतचा फोटो शेअर करताच पुन्हा एकदा त्याच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.