नवी दिल्ली :  देशातच नव्हे तर संपूर्ण जागात कोरोना व्हायरसने हाहाःकार माजवला आहे. कोरोनासोबत असलेली ही साखळी तोडण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर उपाययोजना करत असल्याचं दिसून येत आहे. तरी देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत कोणत्याही प्रकारची घट होत नसल्याची बाब वारंवार उघडकीस येत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज ५० हजार किंवा त्यापेक्षा जास्त रुग्णसंख्या आढळून येत आहे. शिवाय शुक्रवारी भारतात ७७९ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३५ हजार ७४७ इतकी झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत भारताने आता इटलीला देखील मागे टाकले आहे.  कोरोना मृतांच्या संख्येत भारत आता पाचव्या स्थानी पोहोचला आहे. इटलीत करोनामुळे आतापर्यंत ३५ हजार १३२ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.


आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ३० जूनपर्यंत भारतात कोरोना रुग्णांची संख्या ५ लाख ६६ हजार ८४० इतकी होती. तर फक्त एका महिन्यात म्हणजे जुलै महिन्यात जवळपास १० लाख नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. 


केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी भारताने १६ लाख रुग्णांचा टप्पा ओलांडला. आतापर्यंत भारतामधील १६ लाख ३८ हजार ८७१ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ५ लाख ४५ हजार ३१८ जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर १० लाख ५७हजार ८०६ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.