देशात कोरोना रुग्णवाढीचा नवा उच्चांक; २४ तासांत कोरोनाचे २२७७१ रुग्ण वाढले
देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही जास्त आहे.
नवी दिल्ली: देशात शनिवारी कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येचा नवा उच्चांक नोंदवला गेला. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे २२,७७१ रुग्ण आढळून आले आहेत. तर ४४२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६,४८, ३१५ वर जाऊन पोहोचली आहे. यापैकी २,३५,४३३ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर ३,९४,२२७ जण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर देशातील एकूण मृतांचा आकडा १८६५५ इतका आहे.
ठाणे जिल्हा डेंजर झोनमध्ये; एक्टिव्ह रुग्णसंख्येत मुंबईलाही टाकले मागे
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही जास्त आहे. सध्याच्या घडीला देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६०.८० टक्क्यावर जाऊन पोहोचले आहे.
'१५ ऑगस्टपर्यंत देशी लस आणायचा ICMR चा अट्टाहास धोकादायक आणि मूर्खपणाचा ठरेल'
महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे. शुक्रवारी महाराष्ट्रात सर्वाधिक ६३६४ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर १९८ जणांचा मृत्यू झाला. तर मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ८२,०७४ वर जाऊन पोहोचला आहे. महाराष्ट्रातील मृत्यूदर ४.३४% एवढा आहे. मात्र, रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ५४.२४% टक्के आहे. शुक्रवारी महाराष्ट्रातील ३५१५ रुग्णांना घरी सोडण्यात आले.
दरम्यान, भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने (ICMR) १५ ऑगस्टपर्यंत कोरोनावरील देशी लस विकसित होण्याचा अंदाज वर्तविला आहे. हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनीने विकसित केलेल्या मानवी लसीच्या चाचणीला २९ जून रोजी परवानगी देण्यात आली होती. यानंतर आता देशातील १२ वैद्यकीय संस्थांमध्ये या लसीची मानवी चाचणी होणार आहे. मात्र, इतक्या वेगाने लस निर्माण करण्यासंदर्भात भारतातील तज्ज्ञांमध्ये अनेक मतभेद आहेत.