नवी दिल्ली: जुलै महिन्यात भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला पोहोचेल, ही तज्ज्ञांनी वर्तविलेली भीती आता खरी ठरताना दिसत आहे. कारण, गेल्या २४ तासांमध्ये देशभरात कोरोना व्हायरसची Coroanvirus लागण झालेले तब्बल २५ हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांच्या या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येमुळे देशातील आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना लसीच्या उत्पादनावरून होणाऱ्या वादांवर ICMR चा मोठा खुलासा

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे २४,८५० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ६१३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६,७३,१६५ इतकी झाली आहे. यापैकी २,४४,८१४ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर ४,०९,०८३ जण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. मात्र, कोरोनामुळे देशातील १९,२६८ जणांचा बळी गेला आहे. 



महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे. शनिवारी महाराष्ट्राने नव्या कोरोना रुग्णसंख्येचा नवा उच्चांक गाठला. काल दिवसभरात महाराष्ट्रात कोरोनाचे ७०७४ नवे रुग्ण आढळून आले. तर २९५ जणांचा मृत्यू झाला. 

दरम्यान, भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने (ICMR) १५ ऑगस्टपर्यंत कोरोनावरील देशी लस विकसित होण्याचा अंदाज वर्तविला आहे. हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनीने विकसित केलेल्या मानवी लसीच्या चाचणीला २९ जून रोजी परवानगी देण्यात आली होती. यानंतर आता देशातील १२ वैद्यकीय संस्थांमध्ये या लसीची मानवी चाचणी होणार आहे. मात्र, इतक्या वेगाने लस निर्माण करण्यासंदर्भात भारतातील तज्ज्ञांमध्ये अनेक मतभेद आहेत.